Tilak Varma ठरला भारतासाठी वनडेत पदार्पण करणारा 252 वा खेळाडू | पुढारी

Tilak Varma ठरला भारतासाठी वनडेत पदार्पण करणारा 252 वा खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tilak Varma : आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली असून बांगलादेशचा संघ सलग दोन सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघ या सामन्यात 5 बदलांसह मैदानात उतरला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये धमाकेदार कामगिरी करणा-या तिलक वर्माचे (Tilak Varma) वनडेमध्ये पदार्पण झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याला भारतीय कॅप प्रदान केली. तो भारतासाठी वनडेमध्ये पदार्पण करणारा 252 वा खेळाडू आहे.

हैदराबादकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तिलकने (Tilak Varma) 7 टी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी 174 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियासाठी तो सर्वोत्तम फलंदाज होता. लिस्ट ए क्रिकेट म्हणजेच देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे तर, तिलकने (Tilak Varma) 25 सामन्यांमध्ये 56 च्या सरासरीने आणि 102 च्या स्ट्राइक रेटने 1236 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वात मोठी खेळी 156 धावांची आहे. यासोबतच त्याच्या नावावर 8 विकेट्स आहेत.

आशिया कपसाठी भारतीय संघात तिलक वर्माचा (Tilak Varma) समावेश करण्यात आला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्याला बक्षीस मिळाले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वर्मा हा गोलंदाजीही करू शकतो, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने मधल्या फळीतील बॅकअप फलंदाज म्हणून त्याची निवड केली आहे.

भारताने सुपर फोर फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामन्यात श्रीलंकेशी लढत होणार आहे. श्रीलंकेने गुरुवारी पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बांगलादेशविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आधीच अंतिम फेरीत स्थान पक्के करणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यासाठी पाच बदल केले आहेत. तिलक वर्मा वनडे संघात पदार्पण करणार आहे, तर सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर प्लेईंग इलेव्हनमध्ये परतले आहेत. विराट कोहली, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. तनझिम शाकिब बांगलादेशकडून पदार्पण करत आहे.

Back to top button