AUS vs SL : परेराने वॉर्नरला आणले फॉर्ममध्ये; लंकेचा पराभव | पुढारी

AUS vs SL : परेराने वॉर्नरला आणले फॉर्ममध्ये; लंकेचा पराभव

दुबई : पुढारी ऑनलाईन

AUS vs SL  : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर फॉर्ममध्ये परतला असून त्याच्या ६५ धावांच्या आक्रमक खेळीमुळे कांगारुंनी श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. वॉर्नरने फिंचबरोबर ७ षटकात ७० धावांची धकाडेबाज सलामी दिली. फिंचने ३७ धावा केल्या तर स्मिथने नाबाद २८ धावांची खेळी करुन १७ व्या षटकातच ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. श्रीलंकेकडून हसरंगाने दोन विकेट घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टार्क, कमिन्स आणि झाम्पा यांनी प्रत्येकी २ विकेट घेत श्रीलंकेला १५५ धावात रोखले.

ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेने ठेवलेल्या ( AUS vs SL ) १५५ धावांचे ठेवलेले लक्ष्य पार करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक सुरुवात केली. या आक्रमणाचे फिंचने नेतृत्व केले. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

AUS vs SL : वॉर्नर फॉर्ममध्ये परतला

फॉर्मसाठी चाचपडत असलेला डेव्हिड वॉर्नरही फॉर्ममध्ये परतत होता. दरम्यान, श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुसल परेराने डेव्हिड वॉर्नरचा १८ धावांवर हातातला झेल सोडला आणि त्याला जीवनदान दिले. या जीवनदानाचा वॉर्नरने चांगलाच फायदा उचलला. या सलामी जोडीने ७ षटकात ७० धावांची सलामी दिली.

मात्र त्यानंतर हसरंगाने फिंचला ३७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात हसरंगाने ग्लेन मॅक्सवेलची ५ धावांवर शिकार करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. या दोन धक्क्यांनी दबावात आलेल्या ऑस्ट्रेलियाला फॉर्ममध्ये परतत असलेल्या वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने सावरले.

वॉर्नरने दमदार अर्धशतक झळकावत संघ व्यवस्थापनाचे टेन्शन दूर केले. दुसऱ्या बाजूने स्मिथही त्याला चांगली साथ देत होता. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. सामना आवाक्यात आल्यानंतर ४२ चेंडूत ६५ धावा करणारा डेव्हिड वॉर्नर शनकाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर स्मिथ आणि स्टॉयनिसने १७ षटकात विजयाची औपचारिकता पूर्ण केली. स्मिथने नाबाद २८ धावा केल्या.

तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या ( AUS vs SL ) सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सने सलामीवीर पथूम निसंकाला ७ धावांवर बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर मात्र श्रीलंकेच्या कुसल परेरा आणि चरिथ असलंकाने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी कण्यास सुरुवात केली.

या दोघांनी पॉवर प्लेमध्येच लंकेचे अर्धशतक धावफलकावर लावले. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचत संघाला १० व्या षटकात ७८ धावांपर्यंत पोहचवले. मात्र ही जोडी अॅडम झाम्पाने फोडली. त्याने २७ चेंडूत ३५ धावा करणाऱ्या असलंकाला माघारी धाडले. त्यानंतर स्टार्कनेही सेट झालेल्या कुसल परेराला ३५ धावांवर बाद करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला.

दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाल्यानंतर श्रीलंकेची धावगती मंदावली. त्यातच झाम्पाने अविष्का फर्नांडोला ४ धावांवर बाद करत लंकेला शंभरच्या आत ४ था धक्का दिला. त्यातच पुढच्याच षटकात स्टार्कने हसरंगाला ४ धावांवर बाद करत पाचवा धक्का दिला. या पडझडीदरम्यान श्रीलंकेने १५ व्या षटकात शतक पूर्ण केले.

AUS vs SL : राजपक्षेने लंकेला सावरले

दरम्यान, निम्मा संघ माघारी गेल्यामुळे मंद झालेली धावगती राजपक्षेने वाढवण्यास सुरुवात केली. त्याने १७ वे षटक टाकणाऱ्या स्टॉयनिसच्या षटकात दोन चौकार एक षटकार मारत १७ धावा वसूल केल्या. राजपक्षे नंतर शनकानेही मोठे फटके मारण्यास सुरुवात केली.  मात्र कमिन्सने त्याला १२ धावांवर बाद करत लंकेला सहावा धक्का दिला. शनका बाद झाला त्यावेळी लंकेच्या १८ षटकात १३५ धावांपर्यंत पोहचला होता.

अखेरच्या दोन षटकात राजपक्षे आणि चमिका करुनारत्ने यांनी शेवटच्या दोन षटकात १९ धावा करुन लंकेला २० व्या षटकात १५४ धावांपर्यंत पोहचवले. राजपक्षेने नाबाद ३३ तर करुणारत्नेने नाबाद ९ धावांचे योगदान दिले.

Back to top button