कोल्हापूर : शाहू गोल्डकप शिवाजी मंडळकडे | पुढारी

कोल्हापूर : शाहू गोल्डकप शिवाजी मंडळकडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सुमारे 50 वर्षांची परंपरा असणार्‍या शाहू छत्रपती गोल्डकप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना गुरुवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर हजारो फुटबॉलप्रेमींच्या जल्लोषी उपस्थितीत झाला. अखेरपर्यंत अत्यंत चुरशीने रंगलेला सामना संपूर्ण वेळ 1-1 असा बरोबरीत झाला. यामुळे निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. श्वास रोखायला लावणार्‍या टायब्रेकरमध्ये शिवाजी तरुण मंडळाने केरळा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड संघाचा 5 विरुद्ध 4 अशा गोलफरकाने पराभव केला. यामुळे स्थानिक शिवाजी तरुण मंडळाला शाहू छत्रपती गोल्डकप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविण्याचा पहिला मान मिळाला.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे (केएसए) चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अंतिम सामना गुरुवारी स्थानिक शिवाजी मंडळ विरुद्ध केरळा स्टेट या संघांमध्ये झाला. सामन्याचे उद्घाटन जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे व विफाच्या महिला अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे यांच्या हस्ते झाले. मुख्य पंच म्हणून सुनील पोवार, सहायक पंच म्हणून अजिंक्य गुजर या कोल्हापूरकरांसह मुंबईच्या साकेत बाविसकर व जिग्नेशा दावणे यांनी काम पाहिले.

दोन्ही गोल पूर्वार्धात

सामन्याच्या सुरुवातीला केरळाच्या अर्जुन व्ही, विक्नेश एम, निजो गिल्बर्ट, करुण बेबी यांनी लागोपाठ चढाया करत आघाडीसाठी प्रयत्न केले. शिवाजीच्या भक्कम बचावफळी व गोलरक्षक मयुरेश चौगुले यांनी या चढाया फोल ठरविल्या. शिवाजीकडूनही गोलसाठी प्रयत्न सुरूच होते. अनिकेत जाधव, निखिल कदम, योगेश कदम, करण चव्हाण-बंदरे, संदेश कासार यांनी खोलवर प्रयत्न केले. यात त्यांना 18 व्या मिनिटाला यश आले. संकेत साळोखेच्या पासवर करण चव्हाण-बंदरे याने गोलची नोंद केली. ही आघाडी फार काळ टिकू शकली नाही. 27 व्या मिनिटाला केरळकडून झालेल्या चढाईत विक्नेशच्या पासवर करुण बेबी याने गोल नोंदवत सामना 1-1 असा बरोबरीत केला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून सावध आणि बचावात्मक खेळाचा अवलंब करण्यात आला. आघाडीसाठी दोन्हीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र फिनिशिंगअभावी दोन्हीकडून गोल होऊ शकले नाहीत. केरळचा विक्नेश एमचा एक प्रयत्न गोलपोस्टला लागून बाहेर गेला. अखेर सामना 1-1 असा बरोबरीत झाला. यामुळे निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.

टायब्रेकरमध्ये शिवाजी मंडळ विजयी

टायब्रेकरमध्ये शिवाजी मंडळकडून सुयश हंडे, विशाल पाटील, संकेत साळोखे, करण चव्हाण-बंदरे, अनिकेत जाधव यांनी उत्कृष्ट गोलची नोंद केली. तर केरळाकडून विक्नेश एम, मोहम्मद सलीम, अर्जुन व्ही, गिफ्टी ग्रेसीयस यांना गोलची परतफेड करता आली. त्यांच्या निजो गिल्बर्टचा स्ट्रोक शिवाजी मंडळचा गोलरक्षक मयुरेश चौगुले याने रोखला. यामुळे शिवाजी मंडळने टायब्रेकरमध्ये 5 विरुद्ध 4 अशा गोलफरकाने विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. विजेत्या संघाचा रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता.

दिमाखदार बक्षीस समारंभ

3 मेपासून सुरू असणार्‍या शाहू छत्रपती गोल्डकपची सांगता गुरुवारी दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्याने झाली. सामन्याच्या सुरुवातीपासून केरळच्या चेंडा वाद्यवृंदाने मैदानात वातावरण निर्मिती केली होती. सामन्यानंतर बक्षीस समारंभ केएसएचे चिफ पेट्रन शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, एआयएफएफचे जनरल सेक्रेटरी डॉ. शाजी प्रभाकरन, भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आय.एम. विजयन, विफाचे सचिव साऊटर वाझ, एआयएफएफचे सदस्य मालोजीराजे, विफाच्या महिला अध्यक्षा मधुरिमाराजे, यशराजराजे, सचिव माणिक मंडलिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. सामन्याचे समालोचन प्रा.डॉ. अभिजित वणिरे, प्रा. उदय आतकिरे, विजय साळोखे, समीर देशपांडे यांनी केले.

कोल्हापुरात भविष्यात वर्ल्ड चॅम्पियन खेळतील

बक्षीस समारंभात मार्गदर्शन करताना ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. शाजी प्रभाकरन यांनी कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमाचे आवर्जून कौतुक केले. फुटबॉलनगरी म्हणून कोल्हापूरची ओळख देशभर झाली आहे. इथले फुटबॉलप्रेमी तन-मन-धन लावून फुटबॉलला प्रोत्साहन देतात. 50 वर्षांची परंपरा असणार्‍या शाहू छत्रपती गोल्डकप स्पर्धेत स्थानिक संघाने अजिंक्यपद पटकावून कोल्हापूरच्या फुटबॉलचा विकास देशपातळीवर झाल्याचे सिद्ध केले आहे. कोल्हापुरात विमानतळासह विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. यामुळे भविष्यात छत्रपती शाहू स्टेडियमवर वर्ल्ड चॅम्पियन फुटबॉलपटू खेळतील. एआयएफएफच्या माध्यमातून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शाहू गोल्डकप दरवर्षी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या भक्कम पायावर कोल्हापूरची क्रीडानगरी विकसित झाली आहे. इथल्या फुटबॉलप्रेमींच्या लोकाश्रयामुळे फुटबॉल खेळ विकसित होत आहे. खेळाडू व त्यांच्या संघांना भक्कम अर्थिक पाठबळ देणार्‍या शाहू गोल्डकप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन भविष्यात दरवर्षी करण्याची घोषणा कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे यांनी बक्षीस समारंभानंतर केली.

बक्षिसांचा वर्षाव…

विजेता : शिवाजी तरुण मंडळ – 2 लाख 50 हजार व फिरता शाहू गोल्डकप आणि कायमस्वरूपी सोन्याची प्रतिकृती
उपविजेता : केरळा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड : 1 लाख 50 हजार व कायमस्वरूपी चांदीचा चषक
बेस्ट प्लेअर : फॉरवर्ड – करण चव्हाण-बंदरे (शिवाजी मंडळ), हाफ – विक्नेश एम (केरळ), डिफेन्स – अरबाज पेंढारी (शिवाजी मंडळ), गोली – मयुरेश चौगुले (शिवाजी मंडळ) : प्रत्येकी 10 हजार रुपये.
मुख्य फेरीत प्रवेशासह विशेष कामगिरीबद्दल : शिवाजी तरुण मंडळ 75 हजार, बालगोपाल तालीम 50 हजार, जुना बुधवार पेठ 50 हजार, पाटाकडील तालीम मंडळ 25 हजार.
तिकीट विक्रीतून संघांना वाटा : शिवाजी तरुण मंडळ 1 लााख 33 हजार, बालगोपाल तालीम 53 हजार, जुना बुधवार पेठ 33 हजार, पाटाकडील तालीम 49 हजार रुपये.

Back to top button