Premier League : मँचेस्टर सिटीच्या विजयात हालँडचा विक्रमी गोल | पुढारी

Premier League : मँचेस्टर सिटीच्या विजयात हालँडचा विक्रमी गोल

लंडन; वृत्तसंस्था : स्टायकर इर्लिंग हालँडने एकाच प्रीमियर लीग हंगामात 35 गोलचा विक्रम केल्यानंतर मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमविरुद्ध 3-0 अशा एकतर्फी फरकाने विजय नोंदवला. मूळ नॉर्वेच्या हालँडने आता अ‍ॅलन शियरर व अँड्य्रू कोल यांचा हंगामात सर्वाधिक 34 गोलचा विक्रम मागे टाकला आहे. एकाच हंगामात सर्व प्रकारात सर्वाधिक गोलचा विक्रमही त्याने यापूर्वीच आपल्या खात्यावर केला आहे. सध्या सर्व प्रकारांत त्याच्या खात्यावर 38 गोल नोंद आहेत. या निकषावर मोहम्मद सलाह दुसर्‍या स्थानी आहे. सलाहने 2017-18 मध्ये लिव्हरपूलतर्फे 32 गोल केले होते. (Premier League)

माझ्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. मला या कामगिरीचा मनापासून आनंद आहे आणि मी हा पराक्रम गाजवू शकलो, याचा अभिमान देखील आहे, असे 22 वर्षीय हालँडने यावेळी नमूद केले. हालँडचा हंगामातील 35 वा गोल दुसर्‍या सत्रात झाला. या विजयामुळे सिटीने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान काबीज केले. सामना पूर्ण झाल्यानंतर परतताना सिटीच्या सहकार्‍यांनी हालँडला दुतर्फा उभे राहून मानवंदना दिली. प्रशिक्षक पेप गॉर्डियाला व क्लबचा बॅकरूम स्टाफ देखील उपस्थित राहिले. या लढतीत मँचेस्टर सिटी संघातर्फे अ‍ॅकेने 49 व्या मिनिटाला, हालँडने 70 व्या तर फॉडेनने 85 व्या मिनिटाला गोल केले. (Premier League)

यापूर्वी कोलने 1993-94 मध्ये न्यू कॅसलतर्फे एकाच हंगामात 34 गोलचा विक्रम केला आणि नंतर शियररने या विक्रमाशी बरोबरी केली. हालँडसाठी इंग्लिश फुटबॉलमधील हे पदार्पणाचे वर्ष असून आपल्या 31 व्या लढतीतच त्याने हा पराक्रम गाजवला. इंग्लंडच्या टॉप डिव्हिजन फुटबॉलमधील एकाच हंगामात सर्वाधिक गोल करणार्‍या खेळाडूंच्या यादीत देखील हालँड आता समाविष्ट झाला असून सर्वाधिक गोलचा विक्रम इव्हर्टनच्या डीक्सी डीनच्या खात्यावर आहे. डीक्सीने 1927-28 च्या हंगामात 39 सामन्यांत सर्वाधिक 60 गोल केले तर रॉन डेव्हिसने 1966-67 मध्ये साऊथम्प्टनतर्फे 37 गोल नोंदवले आहेत.

लिव्हरपूलचा फुलहॅमवर 1-0 फरकाने निसटता विजय

प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील अन्य एका लढतीत लिव्हरपूलने फुलहॅमविरुद्ध 1-0 असा निसटता विजय संपादन केला. लिव्हरपूलचा एकमेव गोल मोहम्मद सलाहने 39 व्या मिनिटाला केला. अँटफिल्ड येथे झालेल्या या लढतीत मिळवलेल्या विजयासह लिव्हरपूलने चौथ्या स्थानावरील मँचेस्टर युनायटेडवरील दडपण कायम राखले आहे.

या लढतीत लिव्हरपूलतर्फे ट्रेंट अलेक्झांडर-अ‍ॅरनॉल्डने पहिल्याच टप्प्यात संघाचे खाते उघडले होते. मात्र, त्याचा फटका पोस्टच्या किंचित बाहेर राहिला. फुलहॅमला दोन्ही सत्रांत बरेच झगडावे लागले. लिव्हरपूलचा संघ आता मँचेस्टर युनायटेडपेक्षा केवळ 4 गुणांनी मागे असून यामुळे लिव्हरपूलसाठी चॅम्पियन्स लीग पात्रतेची आशा-अपेक्षा कायम राहिली आहे. मॅनेजर जर्गेन क्लॉप यांची नवी कार्यपद्धत लिव्हरपूलसाठी उत्तम योगदान देत असल्याचे संघाच्या एकंदरीत कामगिरीवरून स्पष्ट होत असून यामुळे चाहतेही त्यांच्याबाबत खूश आहेत.

लिव्हरपूलने या आठवड्यात आता घरच्या मैदानावर दुसरा विजय नोंदवला असून हा त्यांचा हंगामातील सलग पाचवा विजय आहे. सलाहने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर केले आणि लिव्हरपूलतर्फे घरच्या मैदानावर सलग 8 सामन्यांत गोल नोंदवण्याचा विक्रम त्याच्या खात्यावर नोंद झाला. यासह त्याने गॉर्डन हॉजसन व लुईस सुआरेझ यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. गॉर्डनने 1927-28 मध्ये तर सुआरेझने 2014 मध्ये लिव्हरपूलतर्फे घरच्या मैदानात सलग 8 सामन्यांत गोल केले. मात्र, त्यावेळी या उभयतांसाठी दुखापत किंवा निलंबन अशा कारणामुळे या 8 सामन्यांच्या मध्यात खंड पडला होता. लिव्हरपूलतर्फे सर्वकालीन सर्वाधिक गोल करणार्‍या खेळाडूंच्या यादीत सलाह आता पाचव्या स्थानी विराजमान आहे. स्टीव्हन गेरार्डला मागे टाकण्यासाठी सलाहला फक्त एका गोलची आवश्यकता आहे. सिल्वाने मात्र सलाहच्या कामगिरीबाबत काहीही प्रतिक्रिया न देता मौनात राहणे पसंत केले आहे.

हेही वाचा;

Back to top button