नेपोम्नियाची-लिरेन यांच्यातील तिसरा डाव अनिर्णीत | पुढारी

नेपोम्नियाची-लिरेन यांच्यातील तिसरा डाव अनिर्णीत

अ‍ॅस्ताना, कझाकिस्तान ; वृत्तसंस्था : रशियाचा इयान नेपोम्नियाची व त्याचा चीन आव्हानवीर डिंग लिरेन यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील तिसरी फेरी थ्री फोल्ड रिपिटिशननंतर अनिर्णीत राहिली. उभय ग्रँडमास्टर्सनी 30 चालींमध्येच बरोबरी मान्य केली. दुसर्‍या डावात काळ्या मोहर्‍यांनी विजय संपादन करणारा रशियाचा इयान नेपोम्नियाची येथे पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळत होता. पहिल्या तीन डावाअखेर नेपोम्नियाची 2-1 गुणाने आघाडीवर असून 14 डावांत सर्वप्रथम 7.5 गुण संपादन करणारा ग्रँडमास्टर नवा जगज्जेता असणार आहे.

बुधवारी संपन्न झालेल्या तिसर्‍या फेरीत डिंग लिरेन पहिल्या दोन डावाच्या तुलनेत बराच आश्वासक दिसून आला. टाईम ट्रबलला सामोरे जावे लागले असले तरी यातूनही मार्ग काढण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला.

आपल्याला जो आत्मविश्वास हवा होता, तो या डावाने दिला असल्याचा दावा यावेळी लिरेनने केला. पुढील फेरीत मी कदाचित नेपोम्नियाचीचा हल्ला तितक्याच ताकदीने परतावून लावत विजयही खेचून आणेन, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला.

स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी माझ्यावर बरेच दडपण होते. पण, ते आता दूर झाले आहे आणि मी आता पूर्ण सुसज्ज झालो आहे. मी माझ्या काही मित्रांशी संवाद साधला. ताणतणाव टाळण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधायचा का, याबद्दलही चर्चा झाली. मात्र, आता तशी काही गरज जाणवत नाही. मी या स्पर्धेत आता पूर्ण ताकदीने लढेन, असा विश्वास वाटतो, याचा लिरेनने पुढे उल्लेख केला.

आजची लढत रंजक होती. पण, निकालावर मी फारसा समाधानी नाही. दुसर्‍या डावात मी बराच खराब खेळलो. मात्र, इथे परिस्थिती वेगळी होती. मी एकवेळ विजयाच्या दिशेने आगेकूच करत होतो. अशा अनुकूल स्थितीत बरोबरी मान्य करावी लागणे रास्त ठरत नाही, असे निरीक्षण त्याने पुढे नोंदवले. यापूर्वी मागील दोन लढतीत लिरेनने पटावर थांबण्याऐवजी रेस्ट रूमवर अधिक वेळ व्यतित केला होता. येथे मात्र तो पटावर अधिक वेळ दिसून आला आणि त्याची बॉडी लँग्वेजदेखील अधिक पॉझिटिव्ह होती.

Back to top button