KKR vs RCB : रहमानुल्लाह, शार्दुलची झंझावाती अर्धशतके | पुढारी

KKR vs RCB : रहमानुल्लाह, शार्दुलची झंझावाती अर्धशतके

कोलकाता; वृत्तसंस्था : सलामीवीर रहमानुल्लाह गुरुबाझ (44 चेंडूंत 57) व सातव्या स्थानी फलंदाजीला उतरत मनमुराद फटकेबाजी करणार्‍या शार्दुल ठाकूरच्या (29 चेंडूंत 68) झंझावातासह कोलकाता नाईट रायडर्सने येथील आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीविरुद्ध निर्धारित 20 षटकांत 7 बाद 204 धावांची मजल मारली. मधल्या फळीत रिंकू सिंगने देखील 33 चेंडूंत जलद 46 धावा फटकावल्या.

प्रारंभी, रहमानुल्लाहने 6 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली, तर शार्दुलने चौफेर फलंदाजीचा एकच धडाका लावत 9 चौकार व 3 षटकार वसूल केले. त्याने 45 मिनिटे खेळपट्टीवर टिकून राहत सातत्याने स्ट्राईक रोटेट केले. रिंकूच्या खेळीतही 2 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. कर्ण शर्मा व डेव्हिड विली यांनी प्रत्येकी 2 तर ब—ेसवेल, सिराज, हर्षल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

आरसीबीने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि वेंकटेश अय्यर, मनदीप सिंग, कर्णधार नितीश राणा यांना एकेरी धावसंख्येवर बाद करत 6.1 षटकांत 3 बाद 47 असे रोखून धरले. केवळ रहमानुल्लाहला व नंतर शार्दुलला सूर सापडल्याने केकेआरला थोडीफार आश्वासक धावसंख्या रचण्याकडे आगेकूच करता आली.

अनुभवी आंद्रे रसेल आल्या पावली परतल्याने केकेआरचा संघ 5 बाद 89 असा अडचणीत आला होता. यावेळी तळाच्या स्थानी येत एक बाजू लावून लढणार्‍या शार्दुलला रिंकू सिंगची उत्तम साथ लाभली. रिंकूने खराब चेंडूंचा समाचार घेण्याची रणनीती राबवली आणि यात तो उत्तम यशस्वी ठरला होता.

 

हेही वाचा;

Back to top button