Indore Stadium Pitch Rating : इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलले, BCCI च्या आवाहनानंतर ICC चा मोठा निर्णय | पुढारी

Indore Stadium Pitch Rating : इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलले, BCCI च्या आवाहनानंतर ICC चा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : Indore Stadium Pitch Rating : इंदोर येथील होळकर मैदानाच्या खेळपट्टीचे रेटींग बदलण्यात आले आहे. बीसीसीआयने केलेल्या अपीलनंतर आयसीसीने आपल्या यापूर्वीच्या निर्णयात बदल केला असून आता या खेळपट्टीला ‘खराब’ ऐवजी ‘सरासरी’ रेटिंग दिले आहे.

खेळपट्टीवर अनपेक्षितपणे वळण

बॉर्डर–गावस्कर टॉफीतील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर मैदानावर खेळला गेला होता. ज्यामध्ये संपूर्ण सामन्यात फिरकीचे वर्चस्व राहिले. फिरकी गोलंदाजांनी हा सामना अवघ्या अडीच दिवसात संपवला होता. होळकर मैदानावर फिरकी गोलंदाजांचा चेंडू अनपेक्षितपणे वळण घेत होता. ज्यामुळे, कुठल्याही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभारता आली नव्हती. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट्स पडल्या. संपूर्ण सामन्यात फिरकीपटूंनी 31 पैकी 26 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन संघाने तो सामना नऊ विकेट्सनी जिंकला होता. (Indore Stadium Pitch Rating)

खेळपट्टीवर जोरदार टीका (Indore Stadium Pitch Rating)

या सामन्यानंतर या खेळपट्टीवर जोरदार टीका झाली. आयसीसीनेही होळकर मैदानावरील खेळपट्टीला खराब रेटिंग दिले. त्यानंतर या निर्णयावर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली होती. तसेच, इंदूरच्या खेळपट्टीचे रेटिंग बदलण्याचे आवाहनही केले होते. बीसीसीआयच्या आवाहनानंतर आयसीसीने इंदूर खेळपट्टीच्या रेटिंगमध्ये बदल करत खेळपट्टीचे रेटिंग खराबवरून ‘सरासरी’ केले आहे.

तीन ऐवजी फक्त एक डिमेरिट पॉइंट (Indore Stadium Pitch Rating)

आयसीसीने याबाबत नवी माहिती जाहीर केली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘कसोटी सामन्याच्या फुटेजचे आयसीसी अपील पॅनेलकडून पुन्हा समीक्षा करण्यात आली. ज्यात वसीम खान आणि रॉजर हार्पर यांचा समावेश होता. पॅनेलने असा निष्कर्ष काढलाय की, खेळपट्टीला ‘सरासरीपेक्षा कमी’ रेटिंग दिले जावे, म्हणजेच होळकर स्टेडियमला ​​मूळ तीन ऐवजी फक्त एक डिमेरिट पॉइंट मिळेल.’

सामन्यात काय घडले

इंदोर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याने 11 भारतीय फलंदाजांना तंबूत पाठवले होते. ज्यामध्ये, त्याने पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात 8 गडी बाद केले होते. लायनच्या एका चेंडूने 8 डिग्री वळण घेत, पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराला अनपेक्षितपणे क्लिन बोल्ड केले होते. या व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियन फिरकीपटू मॅथू कुहनेमनने 6 गडी बाद केले होते.

खेळपट्टीच्या मानांकनाबाबत आयसीसीचा ‘हा’ नियम

आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या मैदानाच्या खेळपट्टीला पाच वर्षांच्या कालावधीत पाच किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट मिळतात, तर त्याला एका वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास मनाई आहे. आता आयसीसीच्या निर्णयामुळे भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयसीसीने खेळपट्ट्यांचे मूल्यांकन एकूण सहा श्रेणींमध्ये विभागले आहे. त्यात खूप चांगले (Very Good), चांगले (Good), सरासरी (Average), सरासरीपेक्षा कमी (Below Average), खराब (Poor) आणि अनफिट (Unfit) यांचा समावेश आहे.

Back to top button