भुवनेश्वर कुमार याची कारकीर्द संपली का? | पुढारी

भुवनेश्वर कुमार याची कारकीर्द संपली का?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकले आहेत. यानंतर दोन्ही संघांदरम्यान वन-डे मालिका खेळवण्यात येणार आहे. उर्वरित दोन कसोटी आणि वन-डे मालिकेसाठी बीसीसीआयने रविवारी भारतीय संघाची घोषणा केली. रणजी मिशन फत्ते करून जयदेव उनाडकट अपेक्षेप्रमाणे कसोटी संघात परतला; परंतु वन-डे मालिकेसाठीही त्याला संघात स्थान मिळाले आहे. जवळपास दहा वर्षांनंतर उनाडकट वन-डेत पुनरागमन करत आहे. बांगला देशविरुद्ध त्याने 12 वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन केले होतेे. बीसीसीआय उनाडकटला इतक्या वर्षांनी संधी देत आहे, हे चांगलेच आहे. मग प्रश्न असा पडतो की, भुवनेश्वर कुमार याच्याकडे दुर्लक्ष का? तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणार्‍या भुवनेश्वरचे करिअर संपले, असे समजायचे का?

33 वर्षीय भुवनेश्वर कुमारने निळ्या जर्सीत आपला शेवटचा सामना 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर बीसीसीआयने व्हाईट बॉल क्रिकेटसाठी त्याचा विचार केलेला नाही. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही. याचा अर्थ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या प्लॅनचा तो हिस्सा नाही. भुवनेश्वरने आपला शेवटचा वन-डे सामना एक वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. आधी कसोटी, नंतर वन-डे आणि आता टी-20 अशा क्रमाने बीसीसीआयने भुवनेश्वरला साईडलाईन केले आहे.

अलीकडील काही मालिका सोडल्या, तर भुवनेश्वर कुमार हा भारताच्या प्रमुख गोलंदाजापैकी एक होता. परंतु, थोड्याशा बॅडपॅचनंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि आता निवड समितीच्या डोळ्यापुढे जी नावे आहेत त्यावरून असे वाटते की, भुवनेश्वर आता फक्त आयपीएल खेळतानाच दिसेल. परंतु, क्रिकेटमध्ये असंभव काहीही नसते. जर दिनेश कार्तिक 20 वर्षांनंतर वर्ल्डकप खेळू शकतो, तर भुवनेश्वरसाठीही कमबॅक करणे अवघड नाही.

भुवीचे आंतरराष्ट्रीय करिअर

भुवनेश्वरने आतापर्यंत भारतासाठी 21 कसोटी, 121 वन-डे आणि 87 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 63, वन-डेत 141, तर टी-20 मध्ये 90 विकेटस् घेतल्या आहेत. व्हाईटबॉलमध्ये भुवीचा इकॉनॉमी रेट 7 च्या ही खाली राहिलेला आहे. भारतासाठी त्याने अनेकदा मॅचविनिंग स्पेल टाकले आहेत. तो पुन्हा निळ्या जर्सीत दिसणार की नाही, हे मात्र निवड समितीला माहीत.

स्विंगचा बादशहा

स्वभावाने शांत असलेला भुवनेश्वर कुमार हा वेगवान गोलंदाजाच्या जातकुळीतील वाटतच नाही. कितीही महत्त्वाची विकेट मिळाली तरी चेहर्‍यावर माज नाही की, आक्रस्ताळा जल्लोष नाही. तो वेगवान गोलंदाज म्हणून गणला जात असला, तरी त्याच्याकडे वेग फारसा नव्हता; पण स्विंग मात्र जबरदस्त होता. यातच तो फलंदाजाला चकवून विकेट मिळवत असे. काही वेळा विकेट नाही मिळाल्या तर धावा रोखून धरायचा आणि सामना जिंकून द्यायचा.

गेल वादळात लुकलुकणारी पणती

त्याच्या धावांच्या कंजुषीची कल्पना आयपीएलमधील एका ऐतिहासिक सामन्यावरून येईल. 23 एप्रिल 2013 सालच्या रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध पुणे वॉरियर्स यांच्यातील सामन्यात गेल नावाचे वादळ घोंघावले. त्याने या सामन्यात तब्बल 175 धावा काढल्या. टी-20 मधील पहिले द्विशतक होता होता राहिले. यामध्ये आरसीबीने 263 धावा फलकावर लावल्या. गेलच्या या तडाख्यात गोलंदाजांचे काय हाल झाले असतील याची कल्पना करा. या सामन्यात पुणे वॉरियर्सच्या ईश्वर पांडेने 16.50, अशोक डिंडाने 12.00, मिचेल मार्शने 18.66, अली मुर्तजाने 22.50 आणि अ‍ॅरॉन फिंचने 29.00 इतक्या सरासरीने धावा दिल्या होत्या; पण याच सामन्यात भुवनेश्वर कुमारचा इकॉनॉमी रेट होता 5.75. म्हणजेच त्याने 24 चेंडूंत 23 धावा दिल्या होत्या. गेल वादळाला थोपवण्याचे काम भुवीने केले होते.

Back to top button