IND vs AUS 2nd Test : कांगारूंकडे 62 धावांची आघाडी, भारताचा पहिला डाव 262 धावांत संपुष्टात | पुढारी

IND vs AUS 2nd Test : कांगारूंकडे 62 धावांची आघाडी, भारताचा पहिला डाव 262 धावांत संपुष्टात

पुढारी ऑनलाईन डेस्क : ind vs aus 2nd Test : ऑफ स्पिनर नॅथन लायनच्या फिरकी मा-यापुढे भारतीय फलंदाजांची गाळण उडाल्याने संघाचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला. याचबरोबर रोहित ब्रिगेडला पाहुण्या संघापेक्षा अवघ्या एका धावेने पिछाडीवर रहावे लागले.

ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. लियॉनने 29 षटकांमध्ये 67 धावा देऊन 5 बळी घेतले. त्याला कुहनेमन (2), टॉड मर्फी (2) आणि कमिन्स (1) सुरेख साथ मिळाली. कांगारूंनी आपल्या दुस-या डावाची सुरुवात चांगली केली. त्यांनी दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 12 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात 61 धावा केल्या. याचबरोबर त्यांनी 62 धावांची आघाडी मिळवली आहे. ट्रॅविस हेड (39) आणि मार्नस लॅबुशेन (16) क्रिजवर आहेत.

दुस-या डावात कांगारूंची खराब सुरुवात

कांगारूंच्या दुस-या डावात जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर उस्मान ख्वाजाने स्वीप शॉट मारला, पण चेंडू शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरच्या हाती गेला. अय्यरने चूक न करता शानदार झेल पकडला. ख्वाजाने 13 चेंडूत 6 धावा केल्या.

लायनचा अचूक मारा, भारत बॅकफुटवर

तत्पूर्वी, भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 21 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. रोहित-राहुल या जोडीने संयमी खेळी करत धावफलक हलता ठेवला. पण अर्ध्या तासाच्या खेळानंतर नॅथन लायनने 17.1 व्या षटकात 46 धावांवर पहिला धक्का दिला. लोकेश राहुल 41 चेंडूत 17 धावा करून पायचीत झाला. मैदानी पंचांच्या निर्णयाविरोधात राहुलने रिव्ह्यू घेऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण रिप्लेमध्ये चेंडू स्टंपवर आदळत असल्याचे उघड झाल्याने तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्यण काम ठेऊन भारतीय फलंदाजाला बाद ठरवले.

रोहित आणि पुजारा एकाच षटकात बाद

भारताने एक विकेट गमावून 50 धावा केल्या. पण लगेचच 53 धावसंख्येवर संघाला दुसरा झटका बसला. 19.2 व्या षटकात कर्णधार रोहित शर्मा 69 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. लायनने त्याला क्लीन बोल्ड केले. दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला. यानंतर लायनने पुन्हा एक झटका दिला. त्याने 19.4 व्या षटकात 54 धावांवर भारताची तिसरी विकेट घेतली. चेतेश्वर पुजारा आपल्या 100व्या कसोटीच्या पहिल्या डावात सात चेंडू खेळून खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. एकाच षटकात दोन विकेट गमावल्याने टीम इंडियाला बॅकफूटवर गेली.

श्रेयस अय्यरकडून निराशा

भारताला 66 धावसंख्येवर चौथा धक्का बसला. लायनने श्रेयस अय्यर (15) जाळ्यात अडकवून बळींचा चौकार मारला. पीटर हँड्सकॉम्बने अय्यरचा झेल पकडला. यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी संयमी खेळी करून भारताचा डाव सावरण्याचा अटोकाट प्रयत्न केला. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली. ही भारतासाठी मोठी धावसंख्या करण्यात मोलाची भूमिका बजावेल असे वाटत असतानाच 125 धावसंख्येवर रवींद्र जडेजा 74 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. 46.5 व्या षटकात टॉड मर्फीने त्याला पायचित पकडले. जडेजाने आपल्या खेळीत चार चौकार मारले. जडेजा आणि कोहलीने 59 धावांची भागीदारी केली.

भारताला सलग दोन धक्‍के

लंच नंतर भारताला सलग दोन धक्‍के बसले. 49.3 व्‍या षटकात 135 धावांवर भारताला कोहलीच्या रुपात सहावा धक्‍का बसला. 44 धावांवर खेळत असलेल्‍या कोहलीला कुहनेमनने पायचीत केले. यानंतर 51 व्‍या षटकामध्‍ये नॅथन लायनने 12 धावांवर खेळणार्‍या श्रीकर भरतला बाद केले. त्‍याने स्‍लीपमध्‍ये स्‍टीव्‍ह स्‍मिथकडे झेल दिला. यावेळी भारताची धावसंख्या 7 बाद 139 होती.

अश्विन-अक्षरची अर्धशतकी भागिदारी

भारतीय संघ 200 धावांचा टप्पा तरी गाठेल का असे वाटत असताना आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी धुरा हाती घेऊन संयमी तसेच फटकेबाजीने तिसऱ्या सत्रात भारताची धावसंख्या 200 पार पोहचवली. दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण 253 धावांवर भारताची आठवी विकेट पडली. पॅट कमिन्सने नव्या चेंडूवर अश्विनला मॅट रेनशॉकरवी झेलबाद केले. अश्विनने 70 चेंडूत 37 धावा केल्या. अक्षर-अश्विन जोडीने संघासाठी 114 धावांचे योगदान दिले. 259 धावसंख्येवर अक्षरने विकेट गमावली. त्याने झुंझार खेळीचे प्रदर्शन करून 9 चौकार आणि तीन षटकार खेचत 74 धावा फटकावल्या. अखेर कुहनेमन याने शमीला क्लिन बोल्ड करून भारताचा डाव 262 धावांमध्ये संपुष्टात आणला.

दुस-या डावात कांगारूंची खराब सुरुवात

कांगारूंच्या दुस-या डावात जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केले. स्वीप शॉट मारण्याच्या नादात ख्वाजाने चेंडू शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरच्या हाती पाठवला. अय्यरनेही कसलीच चूक न करता शानदार झेल पकडला. ख्वाजाने 13 चेंडूत 6 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीत मोठा बदल

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी केली. डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडल्याने सलामी जोडीत बदल करण्यात आला. तसेच वॉर्नरच्या जागी मॅट रेनशॉचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे.

Back to top button