महिला टी-20 वर्ल्डकप आजपासून | पुढारी

महिला टी-20 वर्ल्डकप आजपासून

जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून दक्षिण आफ्रिकेत प्रारंभ होत आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले असून 17 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. यंदाची ही आठवी विश्वचषक स्पर्धा आहे. भारतीय महिला संघाने 2020 मध्ये सातव्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती, पण ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकून विजेतेपदावर कब्जा केला. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते.

सलामीचा सामना द. आफ्रिका विरुद्ध श्रीलंका

विश्वचषकाचे सामने केपटाऊनमधील न्यूलँडस् ग्राऊंड, पार्लमधील बोलँड पार्क आणि पोर्ट एलिझाबेथ (एबेरेहा) येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवले जातील. पहिला सामना यजमान द. आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात केपटाऊनमध्ये आज खेळवला जाणार आहे.

अंतिम सामना 26 फेब्रुवारीला

स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 23 फेब्रुवारी, तर दुसरा उपांत्य सामना 24 फेब्रुवारीला होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 26 फेब्रुवारीला केपटाऊन येथील न्यूलँडस् मैदानावर खेळवला जाणार आहे. आयसीसीने 27 फेब्रुवारी ही तारीख (अपरिहार्य परिस्थितीत) अंतिम सामन्यासाठी राखून ठेवली आहे.

दहा संघ दोन गटांत

या स्पर्धेत सहभागी होणार्‍या 10 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. गट ‘अ’ मध्ये द. आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगला देश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ‘ब’ गटात भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया सर्वाधिक पाच वेळा चॅम्पियन

ऑस्ट्रेलियाच्या संघाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. कांगारू संघ 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला आहे. 2009 मध्ये इंग्लंड आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिज विजेते ठरले.

भारताचे सामने

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाचा पहिला सामना 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध आहे. 15 फेब्रुवारीला याच मैदानावर वेस्ट इंडिजशी लढत होईल. तर 18 आणि 20 फेब्रुवारीला पोर्ट एलिझाबेथ येथे अनुक्रमे इंग्लंड आणि आयर्लंड यांच्याशी सामने होतील. टीम इंडियाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजल्यापासून सुरू होतील.

लाईव्ह प्रसारण

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सर्व सामन्यांचे थेट प्रसारण ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्ने हॉटस्टार आणि स्टार स्पोर्टस् वाहिनीवरून करण्यात येणार आहे.

भारत तीनवेळा सेमीफायनलमध्ये

भारताने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात टी-20 विश्वचषकांमध्ये तीन वेळा उपांत्य फेरीत आणि एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडिया 2009, 2010 आणि 2018 मध्ये सेमीफायनल खेळली आहे. त्याचवेळी 2020 विश्वचषकात अंतिम सामना खेळला होता. याशिवाय 2012, 2014 आणि 2016 मध्ये टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्येच पराभूत होऊन बाहेर पडावे लागले होते.

Back to top button