आयसीसीला २० कोटींचा ऑनलाईन गंडा ? | पुढारी

आयसीसीला २० कोटींचा ऑनलाईन गंडा ?

दुबई; वृत्तसंस्था : ऑनलाईन पेमेंट आणि बँकिंगचा जसजसा वापर वाढत आहे तसतसे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. तुमच्या- आमच्या सारखे सामान्य लोक तर रोजच ऑनलाईन फ्रॉडचे बळी पडतात. मात्र, आता मोठमोठ्या संस्था ज्यांच्याकडे अशा फ्रॉडला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री आणि तंत्रज्ञान आहे त्यादेखील अशा ऑनलाईन फ्रॉडला बळी पडत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीला २.५ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास २० कोटींचा आनलाईन चुना लागला असण्याची शक्यता आहे. आयसीसीची अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक ही पहिल्यांदाच झाली • नसून गेल्या काही काळापासून जवळपास चारवेळा त्यांना असा चुना लागला आहे.

दुबईमधील कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ध्यानीमनी नसताना गुरुवारपर्यंत ते ऑनलाईन फसवणुकीचे शिकार होत होते. दरम्यान, आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यांनी याप्रकरणी अजून चौकशी सुरू असल्याचे कारण दिले. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील एका पार्टीला पेमेंट झाले आहे. ही पार्टी आयसीसीचे व्हेंडर असल्याचा दावा केला जात आहे.

फसवणूक करणाऱ्याने आयसीसीच्या मेल आयडीसारखाच ई-मेल आयडी वापरला होता. या घोटाळ्यानंतर आयसीसी सदस्याने मोठा धक्काच बसला. आयसीसी सदस्य देशांची जवळपास २० कोटी रुपये रक्कम गायब झाली आहे. युरोपमधील आयसीसीच्या अस्थायी सदस्य देशाने प्रतिक्रिया दिली की, आयसीसीमध्ये असे काही घडेल असे मला वाटले नव्हते. वन- डे दर्जा प्राप्त असलेल्या अशा संघटनांना वर्षाला ५ लाख ते १ लाख डॉलर्स अनुदान मिळत असते. सध्या या प्रकरणी आयसीसी सर्व स्तरातून चौकशी करत आहे.

Back to top button