Suryakumar Yadav : भारताकडून नववर्षात सुर्यकुमारने झळकावले पहिले शतक | पुढारी

Suryakumar Yadav : भारताकडून नववर्षात सुर्यकुमारने झळकावले पहिले शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क :  श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार शतक झळकावले. एका वर्षातच त्याने भारतासाठी तिसऱ्यांदा टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सूर्याचे हे तिसरे शतक होते. या खेळीने त्याने भारताच्या लोकेश राहुल आणि पाकिस्तानच्या बाबर आझमसह अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. तर, सूर्यकुमार यादवने हा पराक्रम तीनदा केला आहे. (Suryakumar Yadav)

या यादीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात सूर्यकुमारच्या पुढे आहे. रोहितने भारतासाठी टी-२० मध्ये चार शतके झळकावली आहेत आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो फलंदाज आहे. टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोची बरोबरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. झेक प्रजासत्ताकच्या द्विजीनेही आपल्या देशासाठी टी-२० मध्ये तीन शतके झळकावली आहेत. (Suryakumar Yadav)

सूर्यकुमार यादवने जुलै २०२२ मध्ये भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा शतकाला गवसणी घातली. त्यावेळी त्याने ५५ चेंडूत ११७ धावांची खेळी केली. यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ५१ चेंडूत नाबाद १११ धावांची खेळी केली. आणि आज श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५१ चेंडूत नाबाद ११२ धावांची खेळी केली.

या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टी-२० प्रकारातील भारतासाठीचे हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. भारतासाठी सर्वात वेगवान टी-20 शतक रोहित शर्माने २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध झळकावले होते. त्याने ३५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.

हेही वाचा;

Back to top button