मोरोक्को : ‘स्थलांतरित’ खेळाडूंच्या एकत्रित मिश्रणाची यशोगाथा! | पुढारी

मोरोक्को : ‘स्थलांतरित’ खेळाडूंच्या एकत्रित मिश्रणाची यशोगाथा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार विश्वचषक स्पर्धेत यंदा परदेशी जन्मलेल्या खेळाडूंचा सर्वाधिक भरणा आहे. 32 संघांमधील 830 पैकी 137 खेळाडूंनी त्यांच्या जन्मस्थानाव्यतिरिक्त इतर देशांचे प्रतिनिधित्व केले. विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंत अनपेक्षित धडक मारलेल्या मोरोक्कोच्या संघात 26 पैकी 14 खेळाडू हे देशाबाहेर जन्मले आहेत. स्थलांतरित खेळाडूंचे एकत्रित मिश्रण असणा-या या संघाने अवघ्या फुटबॉल जगताला आश्चर्यचकीत केले असून उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला आफ्रिकन देश ठरला.

मोरोक्को संघातील प्लेमेकर हकीम झियेच, बचावपटू नौसैर माजरौई आणि मिडफिल्डर सोफयान अमराबत हे प्रमुख खेळाडू नेदरलँड्समध्ये जन्मलेले आहेत. आचराफ हकीमीचा जन्म स्पेनमध्ये झाला. तो वयाच्या सहाव्या वर्षी रिअल माद्रिदच्या युवा संघात सामील झाला. तर गोलकीपर यासिन बौनो कॅनेडियन वंशाचा आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक वालिद रेग्रागुई, कॅप्टन रोमेन सायस आणि सोफियान बौफल हे जन्माने फ्रेंच आहेत.

मोरोक्कोच्या अनेक खेळाडूंनी युरोपीयन लिगमध्ये आपली छाप पाडली आणि जाणकरांचे लक्ष वेधून घेतले. रॉयल मोरोक्कन फुटबॉल फेडरेशनने देशापासून भौगोलिक अंतराने दूर गेलेल्या तरुण खेळाडूंना एकत्र येण्यासाठी साद घातली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला आणि प्रशिक्षक वालिद रेग्रागुई यांच्या मार्गदर्शनाखाली एका भक्कम संघाची निर्मिती करण्यात यश आले. ज्याची 2022 च्या कतार विश्वचषक स्पर्धेत सा-या जगाला याची देही याची डोळा अनुभुती मिळाली.

‘ग्रुप एफ’पासून विश्वचषक अभियाना सुरुवात करताना मोरोक्कोने पहिल्याच सामन्यात गत उपविजेत्या क्रोएशियाला शुन्य गोलबरोबरीत रोखले. त्यानंतरच्या दुस-याच सामन्यात त्यांनी विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर केला. मोरोक्कोने जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असणा-या बेल्जियमवर धक्कादायकरित्या 2-0 ने विजय मिळवून फुटबॉल जगतात खळबळ उडवून दिली. या पराभवानंतर तर बेल्जियममध्ये दंगल उसळली. संतप्त चाहत्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. एवढा हा पराभव त्यांना जिव्हारी लागला होता.

आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात मोरोक्कोने कॅनडावर 2-1 ने मात करून राऊंड ऑफ 16 मध्ये दिमाखात प्रवेश केला. पण त्यांचा खरा कस लागणार होता तो याच फेरीत. कारण यावेळी गाठ होती ती युरोपमधील बलाढ्य स्पेनशी. टिकीटाका कौशल्यावर आधारीत रणनितीने खेळणा-या स्पेनपुढे मोरोक्कोचा टीकाव लागणार नाही असेच भाकीत फुटबॉल तज्ज्ञांनी केले होते. पण ते अंदाज फोल ठरवत मोरोक्कन खेळाडूंनी स्पॅनिश संघालाही पाणी पाजले. 90 मिनिटांच्या निर्धारीत आणि त्यानंतर 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत मोरोक्कोने स्पेनला शुन्य गोल बरोबरीत रोखले. अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटवर गेला आणि त्यात त्यांनी विश्वविजेत्या स्पेनवर 3-0 ने मात केली. दुर्दैवाची बाब म्हणजे स्पेनला पेनल्टीवर एकही गोल करता आली नाही. या विजयाचा शिल्पकार ठरला होता तो गोलकीपर यासीन बौनो. तो गोल समोर भिंत म्हणून उभा ठाकला आणि त्याने स्पेनला जागतिक स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळण्यास भाग पडले.

उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोला रोनाल्डोच्या पोर्तुगालचा अडथळा पार करायचा होता. रोनाल्डोच्या संघाने आधीच्या सामन्यात स्वझर्लंडवर अर्धा डझन गोल मारून तो सामना 6-1 ने जिंकला होता. त्यामुळे रोनाल्डोचा हा संघ मोरोक्कोला सहज पराभूत करेल असा विश्वास अनेकांना होता. पण मोरोक्क्कोला पोर्तुगालच्या तुलनेत कमी लेखणे घाईचे ठरले. त्या सामन्यात 1-0 असा धक्कादायक विजय मिळवून मोरोक्को विश्वचषकाच्या अंतिम चारमध्ये पोहोचणारा पहिला आफ्रिकन देश बनला. या पराभवाबरोबरच रोनाल्डोचे पुन्हा एकदा स्वप्नभंग झाले. त्यापूर्वी मेक्सिको येथे 1986 च्या वर्ल्ड कपमध्ये मोरोक्कने पहिल्यांदा वेगवान खेळ दाखवला आणि त्या स्पर्धेत ते बाद फेरीसाठी पात्र ठरले. अशी कामगिरी करणारा तो पहिला आफ्रिकन संघ बनला होता.

मोरोक्कोचा विश्वचषकातील प्रवास पाहता त्यांनी उपांत्य सामन्यापूर्वीच्या पाच सामन्यांमध्ये केवळ एक गोल खाल्ला आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात कॅनडा विरुद्ध त्यांच्या बचावफळीतील खेळाडूकडूनच स्वयंगोल झाला होता. प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत मोरोक्कोचे गोलजाळे भेदता आलेले नाही. यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती कॅनडात जन्मलेला गोलकीपर युनेस बौनो याने. तर माद्रिदमध्ये जन्मलेला आचराफ हकीमी उजव्या बाजूने चपळाईने आक्रमण करण्यात तरबेज आहे. त्याला जन्माने डच (नेदरलँड) असणा-या सोफियान अमराबत या शक्तिशाली मिडफील्डरची कौशल्यपूर्ण साथ मिळते. त्याचवेळी फ्रेंच वंशाचा सोफियान बौफल डावीकडून विरोधी संघाच्या बचावफळीला खिंडार पाडण्यात पटाईत आहे.

मोरोक्कन हे युरोपमधील सर्वात मोठ्या स्थलांतरितांपैकी एक असून ही लोकसंख्या अंदाजे 50 लाखाच्या आसपास आहे. इतक्या मोठ्या संख्येने स्थलांतरीत असले तरी मोरोक्कोन नागरीकांची त्यांच्या मायदेशाशी नाळ तुटलेली नाही. कौन्सिल ऑफ द मोरोक्कन कम्युनिटी अॅब्रॉड या सरकारी एजन्सीच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की युरोपमधील 18 ते 35 वयोगटातील 61 टक्के मोरोक्कन लोक दरवर्षी आफ्रिकेतील आपल्या मायदेशाला भेट देतात.

मोरोक्कोच्या बाहेर जन्मलेले पण देशासाठी खेळणारे खेळाडू

यासीन बौनो : जन्म वर्ष 1991 : मॉन्ट्रियल, कॅनडा
मुनीर मोहम्मीदी : जन्म वर्ष 1989 कुएटा, स्पेन
अचराफ हकीमी : जन्म वर्ष 1998 : माद्रिद, स्पेन
नौसैर मजरौई : जन्म वर्ष 1997 : लीडरडॉर्प, नेदरलँड
रोमेन सायस : जन्म वर्ष 1990 : बोर्ग-डी-पीग, फ्रान्स
सोफयान अमराबत : जन्म वर्ष 1996 : हुझेन, नेदरलँड
इलियास चेअर : जन्म वर्ष 1997 : अँटवर्प, बेल्जियम
सेलीम अमल्लाह : जन्म वर्ष 1996 : हॉट्रेज, बेल्जियम
बिलाल एल खाननस : जन्म वर्ष 2004 : स्ट्रॉम्बीक-बेव्हर, बेल्जियम
हकीम झियेच : जन्म वर्ष 1993 : ड्रोनटिन, नेदरलँड
अनास जरौरी : जन्म वर्ष 2000 मेचेलेन, बेल्जियम 1
झकेरिया अबौखलाल : जन्म वर्ष 2000 : रॉटरडॅम, नेदरलँड
सोफियान बौफल : जन्म वर्ष 1993 पॅरीस फ्रान्स
वालिद चेदीरा : जन्म वर्ष 1998 : लोरेटो, इटली

Back to top button