IND vs ZIM : भारताला गरज एका ‘निखळ’ विजयाची | पुढारी

IND vs ZIM : भारताला गरज एका ‘निखळ’ विजयाची

भारत – झिम्बाब्वे (IND vs ZIM) सामन्यासाठी अ‍ॅडलेडहून जेव्हा मेलबर्नच्या विमानतळावर काल उतरलो तेव्हा या दौर्‍यात पहिल्यांदा अंगावरचे जॅकेट काढावेसे वाटले. 20-22 डिग्रीच्या आसपास तापमान, आल्हाददायक हवा, आकाश निरभ्र नसले तरी ढगांपेक्षा निळाई अशा क्रिकेटसाठी आदर्श म्हणावं, वातावरणाने मेलबर्नला स्वागत केले. या विश्वचषकातला हा शेवटचा साखळी सामना आहे, पण दुसर्‍या गटातील संघ उपांत्य फेरीत पोहोचले तरी आपल्या गटातील एकही संघ अजून खात्रीलायकपणे उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही. आजच्या तिन्ही सामन्यांनंतर या उपांत्य फेरीच्या प्रवेशाचा दरवाजा उघडेल. टी-20 क्रिकेटचा थरार या विश्वचषकाने एखाद्या उत्तम सस्पेन्स चित्रपटासारखा शेवटच्या क्षणापर्यंत राखला आहे.

आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे अ‍ॅडलेडला सकाळी नेदरलँड विरुद्ध द. आफ्रिका सामन्याने. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये कुणीच संघ लिंबूटिंबू नाही हे याच मैदानावर न्यूझीलंडला आयर्लंडने दिलेल्या लढतीने दिसून आले तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पत्ता कापायच्या आधी अफगाणिस्ताननेच त्यांचा पत्ता अ‍ॅडलेडमध्येच जवळ जवळ कापला होता. द. आफ्रिका पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने 5 गुणांवरच अडकले आहेत. नेदरलँडविरुद्धचा सामना ते जिंकतील, असे क्रिकेटचे डोके सांगते; पण ते चोकर्ससारखे खेळले तर सकाळी पहिल्या सामन्यातच पाकिस्तान किंवा बांगलादेशचे उपांत्य फेरीचे दार उघडते. द. आफ्रिका जिंकली तर न्यूझीलंड, इंग्लंड पाठोपाठ उपांत्य फेरी गाठणारा तिसरा संघ होईल.

विश्वचषकाचा उपांत्य फेरी गाठण्याच्या नियमाप्रमाणे गुणांना प्रथम महत्त्व आहे, जर गुण समान असतील तर ज्या संघाने जास्त सामने जिंकले आहेत त्याला प्राधान्य दिले जाईल आणि त्यांनतर नेट रनरेट विचारात घेतला जाईल. तेव्हा भारताला उपांत्य फेरी गाठायला झिम्बाब्वेविरुद्ध जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण पाकिस्तान वि. बांगलादेश यांच्यात पाकिस्तान तर जिंकेल त्याचे 6 गुण होतील, त्या संघानेही भारताइतकेच 3 सामने जिंकले असतील आणि आजच्या घडीला भारताचा नेट रनरेट 0.730 आहे तर पाकिस्तानचा 1.117 आहे. बांगलादेश जिंकले तर आपल्याला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवायला आपल्या सामन्याच्या निर्णयाची चिंता नाही. कारण बांगलादेशचा नेट रनरेट -1.276 आहे. अर्थात, पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात किती धावा कोणता संघ काढतो आणि किती धावा देतो यावर हे समीकरण पुन्हा बदलेल. आपला सामना पावसाने वाहून गेला तरी आपण 7 गुणांनी सुरक्षित आहोत, पण मेलबर्नचे हवामान बघता ती शक्यता नाही.

पहिल्या गटात न्यूझीलंड अव्वल तर इंग्लंड दुसर्‍या स्थानावर आहे. आपण सामना जिंकलो तर आपोआप आपण अव्व्ल होऊन आपल्याला इंग्लंडशी दुसरा उपांत्य सामना खेळायचा आहे. जर द. आफ्रिका, बांगलादेश आजचे सामने जिंकले आणि आपण जिंकू शकलो नाही तर आपण दुसर्‍या स्थानावर येऊन न्यूझीलंडशी आपल्याला पहिला उपांत्य सामना सिडनीला खेळावा लागेल. इतक्या शक्यतांचा विचार केल्यावर आता आपल्या सामन्याकडे वळू या. बांगलादेश विरुद्ध बुधवारी जिंकल्यावर आपला संघ गुरुवारीच मेलबर्नला दाखल झाला. शुक्रवार संघाने सरावापासून सुट्टी घेतली आणि जीवाचे मेलबर्न केले. एका मागोमाग एक अटीतटीचे सामने आणि ऑस्ट्रेलियातील प्रवास यामुळे ही विश्रांती संघाला ताजेतवाने करायला गरजेची असते. शनिवारी मात्र विराट कोहलीच्या वाढदिवसाचा केक कापून झाल्यावर संघाने कसून सराव केला. झिम्बाब्वेची गोलंदाजी या विश्वचषकात चांगली झाली आहे.

गरावा आणि मुझारबानी गोलंदाजांची जोडी पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना धावा लुटून देत नाहीत. भारतीय फलंदाजांच्या गरावाच्या गोलंदाजीविरुद्ध खेळण्यासाठी नेटस्मध्ये डावखुर्‍या थ्रो डाऊन्सचा विशेष सराव केला. भारताच्या फलंदाजीत राहुलचा आत्मविश्वास बळावला असेल, मेलबर्नवर धावा काढण्यात फिंच खालोखाल दुसरा क्रमांक कोहलीचा आहे. कोहली आणि सूर्या यांनीच आतापर्यंत भारताच्या धावांचा भार वाहिला आहे. त्यांना मधल्या फळीची साथ मिळायची गरज आहे. भारतीय संघात बदल संभवत नाही. अर्शदीप, शमी आणि भुवनेश्वर यांना उत्तम लय सापडली आहे. झिम्बाब्वेच्या संघात कर्णधार एर्वीन, शुम्बा, विल्यम्स अशा डावखुर्‍या फलंदाजांचा भरणा असल्याने अश्विनही संघात असेलच. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवायला कठीण जायला नको, पण झिम्बाब्वे म्हटले की उगाचच कपिलदेवची अजरामर खेळी आठवते. या विश्वचषकात आपले निसटते विजय बघता उपांत्य फेरीच्या प्रवेशासाठी आणि तयारीसाठी आज आपल्याला कुणी एक हिरो न बनता एका ‘निखळ’ विजयाची गरज आहे.

5-0

भारत आणि झिम्बाब्वे संघात आतापर्यंत 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व पहायला मिळाले आहे. कारण भारताने सातपैकी पाच सामन्यांत विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघाने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे.

झिम्बाब्वेचे 3 गुण (IND vs ZIM)

झिम्बाब्वेने सुपर-12 फेरीतील चार सामन्यांत पाकिस्तानविरुद्ध एकमेव विजय नोंदवला आहे. शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेने हा सामना एका धावेने जिंकला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा त्यांचा सामना अनिर्णीत राहिला. बांगलादेश आणि नेदरलँडविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

निमिष पाटगावकर

हेही वाचा…

Back to top button