T20 World Cup : भारताला विजय आवश्यक, बांगला देशविरुद्ध आज लढत | पुढारी

T20 World Cup : भारताला विजय आवश्यक, बांगला देशविरुद्ध आज लढत

अ‍ॅडलेड, वृत्तसंस्था : अ‍ॅडलेड म्हणजे क्रिकेटचा देव साक्षात सर डॉन ब्रॅडमॅनचे शहर. क्रिकेट पंढरी लॉर्डस्ला जाताना जशी क्रिकेट खेळाने दिलेल्या आनंदामुळे एक कृतज्ञतेची भावना असते तशीच भावना या खेळाच्या देवाच्या गावाला येताना होती. पर्थहून मी अ‍ॅडलेडला पोहोचलो तेव्हा स्वागताला पाऊस हजर होताच. अ‍ॅडलेडचा पाऊस हा बालकवींच्या ‘श्रावणमासी’ कवितेसारखा ‘क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’ सारखा आहे. एखादी मोठी सर येते आणि तिच्या मागे रांगेत सूर्यदेव आकाशात इंद्रधनुष्याची नक्षी करत उभा असतो. गेले दोन दिवस इथे असा पाऊस आहे; पण आज बुधवारी पाऊस नसेल. बरीच लोकं पावसाचा 70-80 टक्के अंदाज बघून धास्तावतात. ही टक्केवारी असते ती पाऊस पडायच्या शक्यतेची; पण त्यात पाऊस किती पडतो, यावर सर्व अवलंबून असते.

रोहितला करावी लागणार संघ निवडीची कसरत

आजही भारताचा इथे दुसरा सामना आहे. सकाळचा नेदरलँडस्-झिम्बाब्वे सामना झाल्यावर आपल्याला इथे खेळायचे आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने आपल्याला हा सामना जिंकावाच लागेल. भारताच्या सुदैवाने आतापर्यंतचे आपले तिन्ही सामने पूर्ण झाले; पण एकंदरीत पावसाच्या गोंधळामुळे सामना नुसता जिंकण्यापेक्षा नेट रनरेट वाढवत जिंकणेही गरजेचे झाले आहे. बांगला देश विरुद्धचा आपला विजयाचा रेकॉर्ड उत्तम आहे; पण हा विश्वचषक आहे. तेव्हा कोणत्याही संघाला कमी लेखू शकत नाही.

भारताच्या पर्थच्या संघात बदल संभवत नाही. एकच बदल झाला तर दिनेश कार्तिकच्या तंदुरुस्तीचे निदान आज सकाळी होईल. तो फिट नसला तर ऋषभ पंत संघात येईल. वास्तविक ऋषभ पंतला संघात का स्थान नाही हे अनाकलनीय आहे. ऋषभ पंतने इंग्लड, ऑस्ट्रेलियात मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. मॅच विनर असायला कसोटी, वन-डे अथवा टी-20 असा फरक नसतो तर खेळाचे आकलन करून त्याप्रमाणे खेळ करायची ती वृत्ती असते. ऋषभ पंतने ती अनेकदा दाखवली आहे. दिनेश कार्तिकला आपण फिनिशर म्हणून घेतले आहे; पण दोन सामन्यांत तो फिनिशरच्या ऐवजी पॅनिकर झाला. पाकिस्तानविरुद्ध त्याला संधी होती. द. आफ्रिकेविरुद्ध त्याचे काम सूर्याला साथ द्यायचे होते; पण त्याने चुकीचा फटका खेळला. 37 वर्षांच्या कार्तिकसाठी एक हाती सामना फिरवून देऊ शकणार्‍या पंतला बाहेर बसवणे राहुल द्रविडच्या कुठच्या फॉर्मुल्यात बसते हे तोच जाणे. के. एल. राहुल बद्दल कितीही लिहिले तरी त्याचे संघातील मानाचे स्थान अबाधित असेल.

भारतीय संघाने द. आफ्रिकेच्या विरुद्ध विजयी संघात बदल करून हुडाला का घेतले, याची उत्तरे आपण अजून शोधत आहोत; पण त्याला अश्विनचे एक षटक देण्याइतका कर्णधाराचा विश्वास नव्हता. आता बांगला देशच्या संघात टॉपच्या 5 फलंदाजांपैकी 4 डावखुरे असताना अश्विन आणि हुडाला संघात कायम ठेवतील, असा अंदाज आहे. दुसरा पर्याय म्हणजे बांगलादेशी फलंदाज लेगस्पिन गोलंदाजी खेळण्यात गडबडतात तेव्हा डावखुर्‍या फलंदाजांसाठी अश्विनला कायम ठेवून कदाचित हुडाऐवजी चहल हा बदल होऊ शकतो. मर्यादित पर्यायातून संघाचा समतोल राखायची कसरत रोहित शर्माला करायची आहे.

बांगला देशची फलंदाजी चिंतेचा विषय

बांगला देशने या विश्वचषकात फलंदाजी मजबूत करायला एक जादा फलंदाज खेळवला असला, तरी त्यांची फलंदाजी या विश्वचषकात चिंतेची बाब आहे. प्रशिक्षक डोनाल्डच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला त्यांचा जलदगती गोलंदाजांचा चमू ऑस्ट्रेलियन वेगवान खेळपट्ट्यांवर उत्तम कामगिरी करत आहे. तीन सामन्यांत 8 बळी घेत तस्कीन अहमद आज विश्वचषकात सर्वात जास्त बळी घेणारा आहे. बांगला देश 3 प्रमुख गोलंदाज आणि शाकिब अल हसन असा चार गोलंदाजांचा ताफा घेऊनच खेळतील. कारण, भारताच्या जलदगती मार्‍याविरुद्धही ते जादा फलंदाज खेळवतील. पाचव्या गोलंदाजांची जागा मोसादेक हुसैन, आतिफ हुसैन आणि सौम्या सरकार भरून काढत आहेत. या कामचलाऊ पाचव्या गोलंदाजच्या जोडगोळीविरुद्ध आतापर्यंत नेदरलँडस्ने 4 षटकांत 43, द. आफ्रिकेने 3 षटकांत 27 धावा काढल्या आहेत. तेव्हा बांगला देशला भारताच्या फलंदाजीविरुद्ध हा धोका घ्यायचा का पाचवा गोलंदाज घ्यायचा, याचा विचार करावा लागेल.

अ‍ॅडलेडची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल तेव्हा हा सामना दोन्ही संघांच्या फलंदाजीच्या ताकदीवरचा असेल. बांगला देशचा सलामीवीर नजमूल शांतो अजून भारताविरुद्ध खेळलेला नाही. सौम्या सरकार आणि लिट्टन दासची भारताविरुद्ध खेळलेल्या सामन्यातील सरासरी 15 च्या आत आहे. तेव्हा बांगला देशची फलंदाजी भारताविरुद्ध कमकुवत आणि अननुभवी आहे. हा सामना संध्याकाळी प्रकाशझोतात खेळला जाणार आहे. नव्या चेंडूवर प्रकाशझोतात जलदगती गोलंदाजांना सुरुवातीला मुव्हमेंट मिळेल; पण नंतर या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे असेल.

खेळपट्टी

* अ‍ॅडलेडची खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजीला पोषक राहिली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या संघाची येथे सरासरी 170 धावांची आहे. फक्त पावसाने येथे विघ्न आणू नये, अशी चाहत्यांची प्रार्थना असेल.

* भारत-बांगलादेश यांच्यात तीन वर्षांपूर्वीच्या द्विपक्षीय मालिकेनंतर हे दोन संघ टी-20 मध्ये पहिल्यांदाच आमने- सामने येत आहेत.

* अ‍ॅडलेडवर भारताने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाला 37 धावांनी हरवले होते.

* बांगलादेशनेही येथे 2015 च्या विश्वचषकात इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.

* 2022 मध्ये सूर्यकुमारच्या 935 धावा झाल्या आहेत. या सामन्यात त्याला वर्षात हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे.

(थेट ऑस्ट्रेलियातून – निमिष पाटगावकर)

Back to top button