पवार-शेलार गटाची मुंबई क्रिकेटवर सत्ता | पुढारी

पवार-शेलार गटाची मुंबई क्रिकेटवर सत्ता

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी अमोल काळे हे निवडून आले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी माजी कसोटीपटू संदीप पाटील यांचा 25 मतांनी पराभव केला. शरद पवार-आशिष शेलार गटाचे काळे यांना 183 मते मिळाली. मुंबई क्रिकेट ग्रुपचे पाटील यांना 158 मते पडली.

देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या एमसीए निवडणूक गुरुवारी (20 ऑक्टोबर) झाली. यात पवार-शेलार गटाचे वर्चस्व दिसून आले. अध्यक्षपदासाठी दुहेरी लढत होती. संदीप पाटील यांच्या रूपाने माजी क्रिकेटपटू मैदानात असल्याने चुरस अपेक्षित होती. मात्र, काळे आणि त्यांना मिळालेल्या मतामध्ये 25 मतांचा फरक आहे.

सचिव आणि खजिनदारपदासाठी तिहेरी लढत होती. त्यात सचिव म्हणून पवार-शेलार गटाचे अजिंक्य नाईक हे विक्रमी 286 मतांनी निवडून आले. नील सावंत आणि मयंक खांडवाला यांना अनुक्रमे 21 आणि 35 मते मिळाली. खजिनदारपदासाठी जगदीश आचरेकर, संजीव खानोलकर आणि अरमान मलिक यांच्यात चांगली चुरस होती. त्यात आचरेकर यांना (161) मलिक यांना (162) मिळाली. मलिक अवघ्या एका मताने निवडून आले. खानोलकर यांना 18 मते पडली. कार्यकारिणीतील 9 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड निवडून आले. वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या निवडणुकीतील मतदानाला चांगला प्रतिसाद लाभला. 368 पैकी 343 मतदारांनी बजावला.

ठाकरेंची मतदानाला पाठ

ठाकरे कुटुंबाकडून उद्धव, आदित्य आणि तेजस अशा तिघांना मतदानाचा हक्क होता. पण या तिघांनी म्हणजेच जवळपास संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यावर भाजपकडून ठाकरेंवर टीका करण्यात आली. ‘ठाकरे कुटुंब संकुचित वृत्तीचे असून इथेही त्यांनी राजकारण आणले,’ असे भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

अध्यक्ष : अमोल काळे- 183, संदीप पाटील- 158 सचिव : अजिंक्य नाईक – 286, नील सावंत – 20, मयंक खांडवाला -35 सहसचिव : दीपक पाटील – बिनविरोध खजिनदार : अरमान मलिक – 162, जगदीश आचरेकर – 161, संजीव खानोलकर – 18

Back to top button