ICC Code of Conduct : मैदानावर भिडणाऱ्या असिफ अली अन् फरिद अहमदला 'आयसीसी'चा दणका | पुढारी

ICC Code of Conduct : मैदानावर भिडणाऱ्या असिफ अली अन् फरिद अहमदला 'आयसीसी'चा दणका

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान रोमहर्षक सामना पहायला मिळाला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज असिफ अली आणि अफगानिस्तानचा गोलंदाज १९ व्या षटकादरम्यान आमने-सामने आले. असिफ अलीने फरिद अहमदवर बॅट उगारली. तर अफगानिस्तानचा गोलंदाज फरिद अहमदही चांगलाच आक्रमक झाला होता. (ICC Code of Conduct)

दरम्यान, मैदानात भिडणाऱ्या या दोन खेळाडूंना आयसीसीने दणका दिला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी असिफ अली आणि फरिद अहमद यांना दंड ठोठावण्यात आला आहे. १९ व्या षटकातील ५ चेंडूनंतर दोघांमध्ये झालेल्या वादामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. असिफ अली आणि फरिद अहमदकडून या सामन्याच्या ‘मॅच फी’ ची २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. (ICC Code of Conduct)

आयसीसी आचारसंहिता कलम २.६ आणि कलम २.१.१२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीत (दि. ७) पाकिस्तानने अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला होता. अटीतटीच्या सामन्यात अफगानिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली होती. शाबाद खान, इफ्तिखार खान यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या षटकात नसीम शाहने दोन षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. (ICC Code of Conduct)

मात्र, पाकविरूद्ध अफगानिस्तान सामन्यातील अंतिम षटक इतके रोमहर्षक होते की, खेळाडूही आपल्या भावना रोखू शकले नाहीत. सामन्याच्या १९ व्या षटकात असिफ अली बाद झाल्यानंतर अफगानिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक जल्लोष करू लागला. जल्लोष करताना फरीद मलिक हा असिफ अलीच्या अगदी जवळ येऊन थांबला. असिफ अलीला मात्र याचा राग आला आणि त्याने फरीद मलिकवर बॅट उगारली. काही वेळानंतर या दोन खेळाडूंमधील वाद रोखण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. या दोन खेळाडूंमधील वादामुळे सामन्यादरम्यान वातावरण चांगलेच तापले होते. (ICC Code of Conduct)

हेही वाचलंत का ?

Back to top button