

टोकियो; वृत्तसंस्था : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आपली कामगिरी चोख बजावत आहेत. या स्पर्धेत अंध खेळाडूंना मार्गदर्शकाची गरज असते. मार्गदर्शकाच्या सूचनेप्रमाणे खेळाडू आपली भूमिका बजावत असतात. या स्पर्धेवेळी एक हृदयस्पर्शी क्षण प्रेक्षकांना अनुभवता आला.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत मार्गदर्शकाने अंध धावपटू असलेल्या केउला निद्रेया परेरा समेडो हिला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. हा क्षण पाहताना उपस्थित देखील भारावून गेले होते. मार्गदर्शक मॅन्युअल अँटोनियो वाझ दा वेइगाच्या प्रेमाचा केउलाने स्वीकार केला.
टी 11 धावपटू केउलाने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिली. तिचे उपांत्य फेरीतील स्थान थोडक्यासाठी हुकले. यामुळे ती निराश झाली होती. मात्र, काही क्षणातच तिच्या चेहर्यावर आनंद दिसून आला. मार्गदर्शक मॅन्युअलने गुडघ्यावर बसत तिला लग्नाची मागणी घातली. मॅन्युअलने तिला अंगठी दिली.
तिनेही त्याला मिठी मारत त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. या हृदयस्पर्शी क्षणामुळे मैदानात उपस्थित असलेले खेळाडूही भारावून गेले. शेजारी उभ्या असलेल्या अंध धावपटूंना त्यांचे मार्गदर्शक आता नेमके काय घडत आहे याची माहिती देत होते. त्यावेळी इतर स्पर्धकांनी टाळ्या वाजवून दोघांचे अभिनंदन केले.