‘मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी’ | पुढारी

'मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी'

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजाच्या निर्धार मेळाव्यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणसंदर्भात केलेली वक्‍तव्ये प्रक्षोभक, जातीय तेढ वाढवणारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली.

मंगळवारी (दि. 31 ऑगस्ट) सोलापुरात ओबीसी निर्धार मेळावा झाला होता. त्यामध्ये मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून वडेट्टीवार उपस्थित होते. त्यांनी मेळाव्यात ओबीसीमध्ये कोणत्याही इतर समाजाचा समावेश होणार नाही. विशेषता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध राहील अशी भूमिका जाहीर केली होती.

यासंदर्भात माऊली पवार म्हणाले, वडेट्टीवार यांनी राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेताना भारतीय राज्यघटनेला अनुसरून कारभार चालविला जाईल, असे म्हटले जाते, पण याची जाणीव वडेट्टीवार यांना नाही का? निर्धार मेळाव्यामध्ये वडेट्टीवार यांनी केलेले वक्तव्य द्वेष पसरवणारे आहे.

ते म्हणाले, कोणी उठून मराठा समाजाला डिवचत असेल तर मराठा हे सहन करणार नाही, याचे भान वडेट्टीवार यांनी बाळगावे. काँग्रेसने त्यांना आपल्यात ठेवले आहे. ते त्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत का? हे पक्षाने जाहीर करावे. त्यांची काँग्रेस पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी.अन्यथा मराठा समाजाला काँग्रेस पक्षावर बहिष्कार टाकावा लागेल.

तसेच समाजात तेढ पसरवणार्‍या अशा मंत्र्यांना रोखला गेला नाही तर जातीय दंगली वाढतील. मराठा युवक रस्त्यावर उतरेल. त्याला संबंधित मंत्री वडेट्टीवार आणि राज्य सरकार जबाबदार असेल. यावेळी पदाधिकारी भाऊ रोडगे, राजन जाधव, विजय पोखरकर, गणेश देशमुख, श्रीरंग लाळे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

Back to top button