कोरोना : दोन्ही डोस घेतलेत? तरी सावधान..! अभ्यासातील निष्कर्ष | पुढारी

कोरोना : दोन्ही डोस घेतलेत? तरी सावधान..! अभ्यासातील निष्कर्ष

कोल्हापूर ः राजेंद्र जोशी

कोरोना लसीचे आपले दोन्ही डोस झालेत?…तरी सावधान! आपल्याला यापुढेही कोरोना प्रतिबंधाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. कारण, देशात केलेल्या एका चाचणी सर्वेक्षणामध्ये कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यसेवेतील कर्मचार्‍यांपैकी सुमारे 25 टक्के कर्मचार्‍यांना लसीकरण होऊनही पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना लस न घेतलेल्या वा लसीचा एक डोस पूर्ण झालेल्या नागरिकांप्रमाणे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर काटेकोरपणे लक्ष द्यावे लागेल.

राजधानी दिल्लीमध्ये भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) आणि मॅक्स हॉस्पिटल यांच्या वतीने संयुक्तरीत्या एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये आरोग्यसेवेत काम करणार्‍या; पण लसीचे दोन्हीही डोस पूर्ण असलेल्या कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 45 ते 90 दिवसांच्या कालावधीत कर्मचार्‍यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. यामध्ये 25 टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांना कोरोना झाल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, हा संसर्ग देशाला सतावत असलेल्या कोरोनाच्या ‘डेल्टा’ या प्रतिरूपापासून झाला आहे.

लसीचे दोन्हीही डोस घेतल्यानंतर कर्मचार्‍यांना संसर्गाची बाधा झाल्याचे आढळून आले असले, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेच कारण नाही. कारण, या कर्मचार्‍यांना झालेला संसर्ग हा सौम्य वा मध्यम स्वरूपाचा होता. या बाधित कर्मचार्‍यांपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर झालेली नाही. काही प्राथमिक उपचारांनंतर हे रुग्ण बरेही झाले; पण कोरोनाने लस घेतलेल्या नागरिकांनाही आपल्या संसर्गाचा डंख मारला, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. कोरोनाची लस निर्माण झाल्यानंतर जगातील बहुतेक कंपन्यांनी या लसींमुळे कोरोनापासून संरक्षण होत असल्याचा दावा केला असला, तरी लसींपासून 100 टक्के संरक्षण मिळत असल्याचा दावा कोणीच केलेला नाही. सध्या जगभरात कार्यरत असलेल्या लसींची परिणामकारकता सरासरी 60 टक्क्यांपासून ते 90 टक्क्यांपर्यंत आहे. याचा अर्थ कोरोनाच्या संसर्गाला सरासरी 10 ते 40 टक्क्यांपर्यंत वाव मिळू शकतो.

लसीकरणामुळे रुग्णाचे गंभीर होणे मात्र कमी होते आणि मृत्यू दर रोखता येणे शक्य होते. सध्या भारतात याच पद्धतीने मृत्यू दर रोखण्यामध्ये यश मिळते आहे. भारतात 1 सप्टेंबरअखेर 66 कोटी 30 लाख 37 हजार 334 लसीचे डोस देण्यात आले होते. 1 सप्टेंबर रोजी 24 तासांमध्ये सुमारे 81 लाख डोसेस देण्यात आले, तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दोनवेळेला लसीकरणाने दिवसाला 1 कोटी डोसचा टप्पा पार केला होता. केंद्र सरकारच्या पातळीवर 15 ऑक्टोबरदरम्यान कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेचा विचार करून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आगामी 45 दिवसांमध्ये लसीचे सुमारे 40 कोटी डोस वितरणाचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून देशातील नागरिकांना किमान एका डोसचे संरक्षण मिळू शकेल. अर्थात, कोरोनाच्या हद्दपारीसाठी शासनाचे दमदार पाऊल पडत असले, तरी कोरोनाच्या प्रतिबंधाच्या उपायांपासून या वर्षअखेरपर्यंत तरी सुटका नाही, हेही निश्चित झाले आहे.

विघ्न दूर ठेवायचे तर…

महाराष्ट्रात विघ्नहर्त्याच्या आगमनाला आता एक आठवडा उरला आहे. या आगमनाच्या पूर्वसंध्येला कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसतो आहे. राज्यातील कोरोनाची दैनंदिन बाधित रुग्णसंख्या चार हजारांच्या टप्प्यावर खाली आली आहे. संपूर्ण राज्याच्या चिंतेचा विषय बनलेल्या कोल्हापुरातील संसर्ग शंभरीच्या टप्प्यावर आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, बुधवारी कोल्हापुरात कोरोनाचा एकही बळी गेला नाही. देशात, राज्यात आणि कोल्हापुरात काय, कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण सरासरी 97 टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे कोरोनाचे विघ्न दूर ठेवायचे असेल, तर नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी लागेल; अन्यथा थोडीशी ढिलाई कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या आगमनासाठी रेड कार्पेट ठरू शकते.

  • डोस घेतलेल्या व न घेतलेल्यांकडूनही प्रतिबंधात्मक उपायांची कडक अंमलबजावणी आवश्यक
  • विघ्नहर्त्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना स्थिती बनते आहे समाधानकारक
  • थोडीशी ढिलाई देऊ शकते तिसर्‍या लाटेला आमंत्रण

Back to top button