गुजरात जायंटस् संघाची विजयी हॅट्ट्रिक | पुढारी

गुजरात जायंटस् संघाची विजयी हॅट्ट्रिक

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  पहिल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेत गुजरात जायंटस् संघाने मुंबई खिलाडीज् संघावर सलग दुसर्‍यांदा मात करताना सलग तिसर्‍या विजयासह हॅट्ट्रिक नोंदवली. रंगतदार झालेल्या लढतीत रंजन शेट्टीच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंटस् संघाने मुंबई खिलाडीज् संघावर 18 गुणांच्या फरकाने विजय मिळवला. याआधीच्या सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्ध्याला 25 गुणांच्या फरकाने पराभूत केले होते.

या सामन्यात रंजन शेट्टीने कर्णधाराला साजेसा खेळ करताना आक्रमणात सहा गुणांची नोंद केली. विनायक पोकर्डे आणि नीलेश पाटील यांनी अनुक्रमे 8 आणि 7 गुणांची कमाई करताना त्याला उत्कृष्ट साथ दिली. मुंबई खिलाडीज् संघाकडून दुर्वेश साळुंखे याने आक्रमणात 11 गुणांची नोंद करताना केलेली झुंज एकाकी ठरली. त्याआधी गुजरात जायंटस् संघाने पॉवरप्लेमधून सुरुवात करताना अक्षय भांगारे, अभिनंदन पाटील यांचे वझिरात रूपांतर केले. हा निर्णय कमालीचा फायदेशीर ठरला आणि त्यांनी कर्णधार विजय हजारे, रोहन कोरे आणि विसाग एस. ही मुंबईची पहिली तुकडी 2 मिनिटे 7 सेकंदात तंबूत परतवून एकूण 10 बचावपटू टिपताना आपल्या संघाला 25-00 अशी आघाडी मिळवून दिली.

दुसर्‍या बाजूला मुंबई खिलाडीज् संघानेसुद्धा पॉवरप्लेमधून बचावाला प्रारंभ करताना गुजरातची पहिली तुकडी 1 मिनिट 30 सेकंदात तंबूत परतवली. साळुंखेने या तुकडीतील अखेरचा खेळाडू खांबावरून सूर मारत बाद केला. साळुंखेने चार बचावपटू टिपताना मुंबईकडून एकूण 11 गुणांची कमाई केली. पहिल्या डावाअखेर दोन्ही संघांमध्ये 27-27 अशी बरोबरी झाली होती. गरगटेने दोन बोनस गुणांसह 2 मिनिटे 30 सेकंद संरक्षण करताना गुजरातकडून कडवी झुंज दिली.

दुसर्‍या सामन्यामध्ये चेन्‍नई क्‍विक गन्स संघाने तेलगू योद्धाज् संघाचा पराभव करीत पहिला विजय मिळवत आपले खाते उघडले. स्पर्धेत रामजी कश्यप याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर चेन्‍नई क्‍विक गन्स संघाने तेलगू योद्धाज् संघावर सहा गुणांच्या फरकाने 52-46 असा विजय मिळवला. चेन्‍नई क्‍विक गन्स संघाकडून रामजी कश्यप याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याने 2 मिनिट 32 सेकंदात 18 गुणांची कमाई केली. जोरदार डाईव्ह मारत रामजीने प्रतिस्पर्धी संघाचे सहा डिफेंडर बाद केले. तसेच पी. नरसय्या यानेदेखील चेन्‍नई क्‍विक गन्सला आठ गुणांची कमाई करून दिली.

Back to top button