वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय | पुढारी

वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय

पोर्ट ऑफ स्पेन; वृत्तसंस्था : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना भारताने 2 गडी राखून जिंकत विजयी आघाडी घेतली. सलामीवीर शाय होपच्या झुंझार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने 50 षटकांत 6 बाद 311 धावांचा डोंगर उभा केला होता. आपला शतकी सामना खेळणार्‍या होपने शतकी खेळी करून हा दिवस संस्मरणीय बनवला. त्याने 135 चेंडूंत 115 धावांची खेळी केली. हा सामना रविवारी (24 जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावरती खेळविण्यात आला.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय विंडीजच्या शाय होप आणि कायेल मेयर्स या सलामी जोडीने सार्थ ठरवत 65 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी विंडीजला पाठोपाठ धक्के देत विंडीजची अवस्था 3 बाद 130 धावा अशी केली. मेयर्स 39 तर ब्रुक्स 35 आणि किंग शून्यावर बाद झाला. दीपक हुड्डा, अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. मात्र, त्यानंतर शाय होप आणि कर्णधार निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी 117 धावांची शतकी भागीदारी रचत संघाला 250 चा टप्पा पार करून दिला. दरम्यान, शाय होपने आपले 13 वे वन डे शतक ठोकले. विशेष म्हणजे शाय होपने आपल्या शंभराव्या सामन्यात शतक ठोकले. होपने 135 चेंडूंत 115 धावा केल्या. यात त्याने 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले. होपने कायेल मेयर्स आणि शमराह ब्रुक्स यांच्या सोबत अनुक्रमे 65 आणि 62 धावांची भागीदारी केली. त्यानंतर होप आणि कर्णधार निकोलस पूरन या दोघांनी 117 धावांची भागीदारी केली. दरम्यान, शार्दुल ठाकूरने पूरनला 74 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. शार्दुल ठाकूरने रोव्हमन पॉवेलला 13 तर 49 व्या षटकात शाय होपला 115 धावांवर बाद केले. मात्र, तोपर्यंत विंडीजने 300 धावांचा टप्पा पार केला होता. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेटस् घेतल्या.

Back to top button