England vs India 1st ODI : रो‘हिट’ बरसला; भारताचा इंग्लंडवर नाबाद विजय | पुढारी

England vs India 1st ODI : रो‘हिट’ बरसला; भारताचा इंग्लंडवर नाबाद विजय

लंडन; पुढारी ऑनलाईन : गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीने कंबरडे मोडलेल्या इंग्लंडला सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगलेच धूवून काढले. इंग्लंडच्या (England vs India 1st ODI) गोलंदाजीच्या साऱ्या मर्यादा उघड करत राेहितने आपल्या शैलीतदार लईत षटकार आणि चौकारांची बरसात करत ५८ चेंडूत ७६ धावा केल्या. खूप दिवसांनी एकत्र खेळणाऱ्या रोहित शिखरच्या जोडीने पुन्हा एकदा शतकी भागीदारी रचली. तर या दोघांच्या जोडीने एकत्र ५००० धावा पुर्ण केल्या. शिखर धवन देखील ५४ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. या दोघांनी शेवट पर्यंत नाबाद रहात इंग्लंडने दिलेल्या अल्पशा ११० धावांच्या आव्हानाचा अगदी २६ व्या षटकातच पाठलाग केला. या सामन्यात रोहितने सहा षटकार ठोकत त्याने एकदिवसीय सामन्यात २५० षटकार लगावण्याची कामगिरी केली.

भारतीय संघाने इंग्लंडच्या (England vs India 1st ODI) संघाला ११० धावांत गुडाळल्या नंतर गोलंदाजीस अनुकूल वाटत असणारी खेळपट्टी भारतीय फलंदाज मैदानात उतरल्यावर फलंदाजीसाठी पोषक ठरल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या दोन्ही फलंदाजांनी अगदी सयंमी सुरुवात केली. त्यांनी कोणतीही घाई गडबड केली नाही. दोन्ही फलंदाजांनी स्थिरावण्यासाठी आवश्यक तो वेळ घेतला. पुढे स्थिरावल्या नंतर दोघांनी आपल्या हवे तसे फटके मारण्यास सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा हा चांगल्या लयीत खेळताना दिसला. त्याने मैदानातील सर्वच दिशेला आपल्या शैली फटकेबाजी केली. त्याने सर्वाधिक पूल शॉटस् खेळले यातील अधिकतर फटकेबाजीत त्याने षटकार लगावले. राेहितने आपले अर्धशतक पूर्णकरत आपण चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. सहा षटकार ठोकून त्याने एकदिवसीय सामन्यात २५० षटकारांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारतातला पहिलाच फलंदाज आहे. तर सर्वाधिक षटकार ठोकण्यातमध्ये तो जगातला चौथ्या क्रमांकावर आहे.

बऱ्याच दिवसांनी संधी मिळालेला सलामीवीर शिखर धवन याने कोणतीही घाई गडबड न करता शांत व संयमी खेळी करत रोहितला चांगली साथ दिली. त्याने ३१ धावांची खेळी केली. पहिल्यांदा या दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वयाचा अभाव पाहण्यास मिळाला. अनेवेळा धावचित होण्यापासून या दोन्ही फलंदाजांनी स्वत:ला बचावले. पुढे लय सापडल्यावर दोघांनी देखिल इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलेच जेरीस आणले. टी २० मालिका जिंकून भारतीय संघ चांगल्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरलेली पाहण्यास मिळाली. गोलंदाजांनी अत्यंत चांगली कामगिरी केली. त्या सोबत फलंदाजांनी देखिल साजेशी कामगिरी केली. आता पहिल्या एकदिवसीय सामन्यात पहिला सामना चांगल्याच फरकाने जिंकून भारताने इंग्लंडच्या संघावर चांगलाच दबाव निर्माण केला आहे. (England vs India 1st ODI)

तत्पुर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ 110 धावांत ऑलआऊट झाला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 5 विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध बुमराहने 5 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. भारताने 10 षटकांत इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 2004 नंतर पहिल्यांदाच असा पराक्रम केला आहे. याआधी यूएई विरुद्ध डम्बुला येथे भारताने 10 षटकात 5 विकेट्स घेतल्या होत्या. (England vs India 1st ODI)

भारताविरुद्ध (England vs India 1st ODI) नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेल्या इंग्लंडला एकामागोमाग एक झटके बसले. जसप्रीत बुमराहने इंग्लंडला सुरुवातीचे धक्के दिले. आपल्या पहिल्याच षटकात त्याने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जसप्रीतने प्रथम जेसन रॉयला बोल्ड केले. त्यानंतर क्रमांक-3 वर फलंदाजीला आलेल्या रूटची शिकार केली. त्याला खातेही उघडता आले नाही आणि तो ऋषभ पंतकडे झेलबाद झाला. दोघेही बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स मैदानात आला, मात्र मोहम्मद शमीने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टोक्स शुन्यवर बाद झाला.

तीन खेळाडू बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो इंग्लंडचा डाव सांभाळेल असे वाटत होते. त्याने 20 चेंडूही खेळले, पण बुमराहच्या भेदक मा-या समोर त्यचा टीकाव लागला नाही आणि तो पंतच्या हाती झेलबाद झाला. बेअरस्टो 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.26 धावसंख्येवर जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पाचवा धक्का देत लियाम लिव्हिंगस्टोनला क्लीन बोल्ड केले. बुमराहची ही चौथी विकेट ठरली. आतापर्यंत 20 षटकांत बुमराहने 6 धावा देत चार बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. लिव्हिन्स्टोन बाद झाल्यानंतर मोईन अलीने कर्णधार बटलरसोबत 27 धावांची भागीदारी केली, परंतु 14 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्याने प्रसिद्ध कृष्णाला आपली विकेट दिली. इंग्लंडला 53 धावांवर सहावा धक्का बसला. तर 15 व्या षटकात मोहम्मद शमीने मोठा झटका देत जोस बटलरला माघारी धाडले. इंग्लंडची 7 वी विकेट 59 धावांवर पडली. बटलरने 30 धावा केल्या. इंग्लंडचा अवघ्या काही वेळातच ऑलआऊट होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 17 व्या षटकात मोहम्मद शमीने क्रिक ओव्हर्टनला बाद करून भारताला 8 वे यश मिळवून दिले. तो 8 धावा करून बाद झाला. इंग्लंडने 22 व्या षटकात 100 धावा पूर्ण केल्या. 24 व्या षटकात बुमराहने कार्सला 15 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. बुमराहची ही 5 वी विकेट आहे.

इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या 4 पैकी तीन खेळाडू शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रॉय, बेअरस्टो आणि रूट हे शुन्यावर बाद झाले होते. तर आज 12 जुलै 2022 ला भारताविरुद्ध खेळताना रॉय, रूट आणि स्टोक्स हे खते न उघडताच माघारी परतले आहेत.

तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने टॉसदरम्यान सांगितले की, विराट कोहली दुखापतीमुळे पहिल्या वनडेतून बाहेर आहे. मात्र, त्याने कोहलीला कसली दुखापत झाली आहे हे स्पष्ट केले नाही. कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. दुसरीकडे जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे.

Back to top button