रणजी करंडक : यशस्वीचे अर्धशतक; मुंबई सुस्थितीत | पुढारी

रणजी करंडक : यशस्वीचे अर्धशतक; मुंबई सुस्थितीत

बंगळूर : वृत्तसंस्था; यशस्वी जैस्वाल (78) याच्या अर्धशतकाबरोबरच सलामीवीर पृथ्वी शॉ (47) व सर्फराज खान (नाबाद 40) यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या बळावर मुंबईने मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवसअखेर 5 बाद 248 अशी सुस्थिती प्राप्त केली आहे. मुंबईच्या नजरा विक्रमी 42 व्या रणजी चषकावर आहेत.

मुंबईने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार पृथ्वी शॉ व यशस्वी जैस्वाल यांनी शानदार फलंदाजी करत 87 धावांची सलामी दिली. अनुभव अग्रवालने जम बसलेली ही जोडी फोडताना पृथ्वीला 47 धावांवर त्रिफळाबाद केले. पृथ्वीने सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजीवर भर दिला. त्याने 79 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार एक षटकारा खेचला. मात्र, त्याला अर्धशतक झळकावता आले नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अरमान जाफरनेही (26) जैस्वालला चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसर्‍या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. सुवेद पारकरने केवळ 18 धावांचे योगदान दिले.

यशस्वी जैस्वाल शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच त्याला अग्रवालने दुबेकरवी झेलबाद केले. जैस्वालने 7 चौकार व एक षटकारासह 78 धावा काढल्या. त्यानंतर हार्दिक तमोरेनही 24 धावांची उपयुक्त खेळी केली. मात्र, त्यानंतर सर्फराज खान (नाबाद 40) व शम्स मुलानी (नाबाद 12) यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईला 5 बाद 248 अशी समाधानकारक स्थिती प्राप्त करून दिली. सर्फराज खाने एका बाजूने चिवट फलंदाजी करताना 125 चेंडूत 3 चौकार ठोकले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई प. डाव : 90 षटकांत 5 बाद 248, यशस्वी जैस्वाल 78, पृथ्वी शॉ 44, सर्फराज खान नाबाद 40, अनुभव अग्रवाल व सारांश जैन प्रत्येकी 2 विकेटस्.

Back to top button