INDvsAUS : विराट सेनेचा मालिकेवर कब्जा, तिसऱ्या सामन्यात कांगारुंना ७ विकेट्सनी मात | पुढारी

INDvsAUS : विराट सेनेचा मालिकेवर कब्जा, तिसऱ्या सामन्यात कांगारुंना ७ विकेट्सनी मात

बंगळूर : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पहिला सामना १० विकेट्सनी गमावणाऱ्या भारताने पुढचे दोन्ही सामने जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेले २८७ धावांचे आव्हान भारताने ७ फलंदाज शिल्लक ठेऊन पार केले. भारताकडून रोहित शर्माने धडाकेबाज ११९ धावांची शतकी खेळी केली. त्याला कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा करुन समर्थ साथ दिली. याचबरोबर श्रेयस अय्यरने ४४ धावांची उपयुक्त खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला स्टिव्ह स्मिथच्या दमदार १३१ धावांच्या शतकी खेळीनंतरही फक्त २८६ धावाच करता आल्या. भारताकडून मोहम्मद शमीने भेदक मारा करत ४ विकेट घेतल्या. त्याला जडेजाने २ आणि नवदीप सैनी, कुलदीप यादवने प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली.  

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने धडाकेबाज सुरुवात केली. शिखरला दुखापत झाल्याने तो सलामीला आला नाही त्याच्याऐवजी राहुल सलामीला आला होता. पण, फॉर्ममध्ये असेल्या राहुल या सामन्यात १९ धावा करुन लवकर बाद झाला. त्यानंतर डावाची सर्व सुत्रे रोहितने आपल्या हातात घेतली. दरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. 

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार विराट कोहलीने रोहितला साथ देण्यास सुरुवात केली. तोपर्यंत रोहितने आपला गिअर बदलला आणि तो ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्या ११० चेंडूच शतक साजरे करत भारताला मजबूत स्थितीत आणले. शतकानंतरही रोहितने आपली आतशबाजी कायम राखत ऑस्ट्रेलियापासून सामना झपाट्याने दूर नेण्यास सुरुवात केली. दरम्यान, विराट कोहलीही आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. त्याने आपले अर्धशतक ६२ चेंडूत पूर्ण केले. त्यानंतर त्यानंतर त्याने आपला गिअर बदलला. त्यामुळे भारत ३६ षटकात २०० च्या पार पोहचला. 

पण, अखेर अॅडम झाम्पाने ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा देत रोहितला ११९ धावांवर बाद केले. रोहित बाद झाला त्यावेळी भारताला विजयासाठी १३ षटकात ८१ धावांची गरज होती. त्यानंतर विराटने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने श्रेयस आय्यरला साथीला घेत कोणताही धोका न घेता भारताला विजयीपथावर घेऊन गेला. टार्गेट आवाक्यात आल्यानंतर श्रेयस अय्यरनेही आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, विराट कोहली ८९ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने विजयाची औपचारिक्ता  षटकात पूर्ण केली. त्याने ४४ धावांची महत्वपूर्ण खेळी करत विराट बरोबर तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी रचली. 

तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही. मोहम्मद शमीने ३ धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला बाद करुन कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर अॅरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना या दोघांमध्ये गोंधळ निर्माण झाला त्यात फिंच १९ धावांवर धावबाद झाला. फिंच बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या २ बाद ४६ धावा झाल्या होत्या.

फिंच बाद झाल्यानंतर आलेल्या मार्नस लॅबुश्चग्ने आणि स्मिथने कांगारुंचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या सामन्यातही तिसऱ्या विकेटसाठी भागिदारी रचत भारताला दबावात आणले होते. आजच्या निर्णायक सामन्यातही या दोघांनी भागिदारी रचत ऑस्ट्रलियाला १५० चा टप्पा पार करुन दिला. स्मिथ आणि लॅबुश्चग्नेने आपली अर्धशतके पूर्ण केली. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत होते. 

पण, जडेजाच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीने लॅबुश्चग्नेचा अप्रतिम झेल पकडत ही जोडी फोडली. लॅबुश्चग्ने आपल्या कारकिर्दितले पहिले अर्धशतक ठोकले त्याने ५४ धावांची खेळी केली. स्मिथबरोबर त्याने तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जडेजाविरुद्ध आक्रमक स्ट्रॅटेजी वापरत डावखुऱ्या मिशेल स्टार्कला फलंदाजीला पाठवले. परंतु तो आक्रमक फटका मारण्याच्या नादात तिसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद केले.  

ऑस्ट्रेलियाच्या ३ आणि ४ अशा दोन विकेट पाठोपाठ पडल्या तरी दुसऱ्या बाजूने स्मिथ चांगली फलंदाजी करत होता. त्याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ४ हजार धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या बाजूने अॅलेक्स कॅरीही त्याला चांगली साथ देत होता. पण, अखेरची १० षटके राहिल्याने कॅरीने कुलदीपला आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला पण, हा प्रयत्न फसला आणि त्याची खेळी ३५ धावांवर संपली, निम्म संघ माघारी गेल्याने कांगारूंच्या सगळ्या आशा स्मिथवर केंद्रीत झाल्या होत्या. दरम्यान, स्मिथने बराच वेळ रेंगाळलेले त्याचे शतक पूर्ण केले.

स्लॉग ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्याने कांगारुंना आपले हात मोकळे करण्याची संधी मिळाली नाही. त्यातच दुसऱ्या बाजूने विकेट पडत असल्याने स्मिथवरही दबाव होता. पण, शतकानंतर स्मिथने आपला गिअर बदलला. त्याने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला ३०० धावांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण, शमीने त्याला १३१ धावांवर बाद करत कांगारुंच्या या मनसुब्यांवर पाणी फेरले. त्यानंतर शमीने कमिन्सचा शून्यावर त्रिफळा उडवत कांगारुंना ८ वा धक्का दिला. त्यानंतर  सामन्याच्या अखेरच्या षटकात शमीने झाम्पाचा यॉर्करवर त्रिफळा उडवत आपली चौथी शिकार केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५० षटकात ९ बाद २८६ धावांपर्यंतच मजल मारु शकला.   

Back to top button