प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘केएसए’ लीग विजेता (video) | पुढारी

प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘केएसए’ लीग विजेता (video)

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ संघाने सर्वाधिक 17 गुणांची कमाई करत ‘केएसए’ लीग स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात प्रॅक्टिसने पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून अजिंक्यपदाची औपचारिकता पूर्ण करत सलग दुसर्‍यावर्षी ‘केएसए’ लीग चषक पटकाविला.  

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ही स्पर्धा गेले महिनाभर छत्रपती शाहू स्टडियमवर सुरू होती. स्पर्धेतील शेवटचा 56 वा सामना रविवारी झाला. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध पाटाकडील तालीम ‘अ’ यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळाचा अवलंब करण्यात आला. 

सामन्याच्या 8 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत कैलास पाटीलने गोलरक्षकाला चकवत उत्कृष्ठ गोलची नोंद करत सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर खेळाचा वेग वाढला. प्रॅक्टिसने आघाडी भक्‍कम करण्यासाठी खोलवर चढाया केल्या. यात त्यांना 32 व्या मिनिटाला यश आले. कैलास पाटीलच्या उत्कृष्ठ पासवर सी पीटरने हेडद्वारे गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळविली.

 उत्तरार्धातही प्रॅक्टिसचा आक्रमक पवित्रा कायम होता. ओंकार मोरे, इंद्रजित चौगले, इमॅन्युअल, रोहित भोसले यांनी चेंडू पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात ठेवण्यावर भर दिला. 48 व्या मिनिटाला राहुल पाटीलने पुढे आलेल्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून गोल नोंदवत सामन्यात 3-0 अशी भक्‍कम आघाडी  मिळविली.

 तीन गोलने पिछाडीवर असणार्‍या ‘पाटाकडील’कडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरूच होते. त्यांच्या वृषभ ढेरे, ओंकार जाधव, ओंकार पाटील, ऋषीकेश मेथे-पाटील यांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. ओंकार जाधवचा फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. प्रॅक्टिसचा गोलरक्षक प्रवीण बलविंदरसिंग याने उत्कृष्ठ गोलरक्षण  करत पाटाकडीलच्या अनेक चढाया फोल ठरवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरपर्यंत ‘पाटाकडील’ला एकाही गोलची परतफेड न झाल्याने सामना प्रॅक्टिसने 3-0 असा जिंकला.

फुटबॉल परंपरेचा विकास :ना. सतेज पाटील 

फुटबॉल खेळाला असणारी शतकोत्तर परंपरा जपण्याबरोबरच ती विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ‘विफा’च्या महिला अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती करत आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी या कार्यास पाठबळ देण्याचे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि ‘केएसए’चे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी महापौर सूरमंजिरी लाटकर, आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, डी. वाय. एस. पी. डॉ. प्रशांत अमृतकर, किशोर कुमार, इंदरलाल चौधरी, अभिराज चव्हाण, दीपक कुलकर्णी, राकेश शर्मा, अशोक रोकडे आदी उपस्थित होते.

संयोजन ‘केएसए’चे सचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, प्रा. अमर सासने, संभाजीराव मांगोरे-पाटील, नितीन जाधव, मनोज जाधव, नंदकुमार बामणे आदींसह ‘केएसए’चे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेत निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी जबाबदारी सांभाळली.

Back to top button