थेट पुरस्कारार्थींमध्ये क्रीडा मार्गदर्शक डावलले | पुढारी

थेट पुरस्कारार्थींमध्ये क्रीडा मार्गदर्शक डावलले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. त्याचबरोबर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याचीही योजना सरकारकडून राबविली जाते; परंतु यावर्षी हे मार्गदर्शक पुरस्कार थेट न देता त्यात विविध अनेक जाचक अटींचा समावेश करण्यात आल्याने या पुरस्काराला अल्प प्रतिसाद मिळाला. पुरस्कारांत क्रीडा मार्गदर्शक डावलले जातात का, अशी चर्चा क्रीडाक्षेत्रात सुरू आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन 1969-70 पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणार्‍या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन 1988-89 पासून शासनाने सुरू केली; तसेच ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते व क्रीडाक्षेत्राशी संबंधित आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यथित केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी सन 2001-02 पासून महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्याची योजना सुरू केली.

शासनाच्या वतीने असे पुरस्कार देत असताना गेल्या 30 ते 32 वर्षांपासून असलेल्या नियमांना गुंडाळून नवीन नियमावली करण्यात आली. या नियमांत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) थेट पात्र ठरणार्‍या खेळाडूंचे क्रीडा मार्गदर्शक थेट पुरस्कारासाठी पात्र राहतील. तथापि अशा क्रीडा मार्गदर्शकाने वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त किमान 8 खेळाडू, दिव्यांगसाठी 12 खेळाडू, वैयक्‍तिक खेळ व सांघिक खेळासाठी 15 खेळाडू घडविणे आवश्यक राहणार आहे. घडविलेल्या खेळाडूंच्या कामगिरीनुसार गुणांकनानंतर गुणानुक्रमे प्रथम येणार्‍या खेळाडूंचे त्या त्या विभागातील क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरिता पात्र ठरणार आहेत.

वास्तविक पाहता क्रीडा मार्गदर्शकांसाठी यापूर्वी गुणांकन पद्धत नव्हती; तसेच कोणत्या आधारावर हे गुणांकन ठरविणार, याबाबतही स्पष्टता दिसून आलेली नाही. राज्याचा पुरस्कार असताना क्रीडा मार्गदर्शकाची कामगिरी मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीनुसार धरली जाणार आहे. आशियाई स्पर्धेतील कामगिरीचा गुणांकनात समावेश नसल्याने क्रीडा मार्गदर्शकांची निवड होऊ शकणार नाही. त्यामुळे शासनाकडून पुरस्कारात क्रीडा मार्गदर्शकांना डावलले जात आहे का, अशी चर्चा क्रीडाक्षेत्रात सुरू आहे.

खेळाडू घडविण्यात प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा संघटकांची भूमिका महत्त्वाची असते; परंतु अशा पुरस्कारांत नियमांच्या माध्यमातून क्रीडा मार्गदर्शक डावलले जात असतील, तर ती गंभीर बाब आहे. शासनाने बदललेल्या नियमांबाबत पुनरुच्चार करून योग्य तो न्याय द्यावा. त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कारासाठी असलेली वशिलेबाजी ही थांबवावी.

– लतेंद्र भिंगारे, 

संस्थापक अध्यक्ष,

बाऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशन.

(पूर्वार्ध…)

Back to top button