न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर, भारताची डोकेदुखी वाढणार? | पुढारी

न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर, भारताची डोकेदुखी वाढणार?

वेलिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारीला वेलिंग्टनवर होणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या 13 सदसीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदात ट्रेंट बोल्टचे पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकावे लागले होते. बोल्ट बरोबरच कायल जेमिसनही आपले कसोटी पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे दोन वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. 

न्यूझीलंडचे प्रशिक्षक जॉन स्टेड यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करत ‘ट्रेंट संघात परतणे ही मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. तो गुणवान गोलंदाज आहेच त्याचबरोबर त्याचा उत्साह आणि अनुभव संघासाठी फायदेशीर ठरणार आहे.’ ट्रेंट याच्या परतण्यावर आनंद व्यक्त केला. स्टेड यांनी एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करत कसोटी पदार्पण करण्यास सज्ज असलेल्या कायल जेमिसनचेही कौतुक केले. त्यांनी ‘कायल हा आमच्या ताफ्यात विविधता आणतो. त्याची चेंडूला अधिक उसळी निर्माण करण्याची क्षमता वेलिंग्टनच्या खेळपट्टीवर आमच्यासाठी फायदेशीर ठरेल.’ असे म्हणत तो वेलिंग्टनमध्ये कसोटी पदार्पण करणार असल्याचे संकेत दिले. 

बोल्ट आणि जेमिसन बरोबरच अजिझ पटेलचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळलेल्या लेग स्पिनर टॉड अॅस्ट्लेची जागा घेतली आहे. 

न्यूझीलंडचा पहिल्या कसोटीसीठीचा 13 सदस्यांचा संघ 

केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लुंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रँडहोमी, कायल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरल मिशेल, हेन्री निकोल्स, अजिझ पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉल्टिंग. 

Back to top button