विजयी हॅट्ट्रिकसाठी टीम इंडिया सज्ज | पुढारी

विजयी हॅट्ट्रिकसाठी टीम इंडिया सज्ज

मेलबर्न : वृत्तसंस्था

पहिल्या दोन सामन्यांत विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगला देशला नमवल्याने भारतीय महिला संघाचा आत्मविश्‍वास आकाशाला गवसणी घालू लागला आहे. उद्या (गुरुवारी) होणार्‍या लढतीत न्यूझीलंडलाही नमवून विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलनजीक पोहोचण्याच्या निर्धाराने टीम इंडिया मैदानात उतरेल. 

पहिल्या दोन साखळी सामन्यांत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर 17 तर बांगला देशला 18 धावांनी नमविले आहे. चारपैकी दोन सामने जिंकून चार गुणांसह ‘अ’ गटात भारत अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळविल्यास हरमनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सेमीफायलनमध्ये प्रवेश करण्यानजीक पोहोचेल. सलामीवीर शेफाली वर्माचे प्रदर्शन शानदार असले तरी स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत यांच्याकडून मोठ्या खेळीची संघाला अपेक्षा आहे. 

शेफालीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 तर बांगला देशविरुद्ध 39 धावा काढल्या. तर, तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस येताना जेमिमा रॉड्रिंग्जनेही 26 व 34 धावांचे योगदान दिले आहे. मात्र, कर्णधार हरमन मात्र मोठी खेळी करू शकलेली नाही. तापातून सावरून मानधना न्यूझीलंडविरुद्ध शानदार खेळी करेल, अशी संघाला अपेक्षा आहे. तापामुळे मानधना बांगला देशविरुद्ध खेळली नव्हती. मधल्या फळीत दीप्‍ती शर्माने शानदार 49 धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाला समाधानकारक स्थितीत पोहोचविले होते. बांगला देशविरुद्ध वेदा कृष्णमूर्तीने 11 चेंडूंत 20 धावांची उपयुक्‍त खेळी केली होती. तर गोलंदाजीत पूनम यादवने शानदार कामगिरी केली आहे. तिने दोन लढतीत 7 तर शिखा पांडेने 5 विकेट घेतल्या आहेत. 

न्यूझीलंडविरुद्ध भारताची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. या संघाविरुद्ध गेल्या तीन सामन्यांत भारतानेच विजय मिळविले आहेत. दरम्यान, न्यूझीलंड संघात कर्णधार सोफी डिवाईन, सूजी बेटस्, ली ताहुहु, अमेलिया केर हे अनुभवी खेळाडू आहेत. या संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 7 विकेटस्ने सहज पराभूत केले आहे. या सामन्यात डिवाईनने नाबाद 75 धावांची खेळी केली होती. यामुळे टीम इंडियाला उद्याच्या सामन्यात विजय मिळविण्यासाठी सांघिक कामगिरी करावी लागणार आहे. 

शेफालीमुळे संघ संतुलित बनला : मानधना

आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये पहिल्या दोन सामन्यांतील  शेफालीच्या कामगिरीवर सलामी फलंदाज मानधना अत्यंत खूश आहे. यासंदर्भात मानधना म्हणाली की, ‘गेल्या दोन वर्षांत खासकरून ‘पॉवर प्ले’मध्ये मी भरपूर धावा जमविल्या आहेत. अगदी तसेच आता शेफाली करीत आहे. यामुळे संघ आता अधिक संतुलित बनला आहे. सुरुवातीच्या षटकात शेफालीने चांगल्या धावा काढून आपली क्षमताच सिद्ध केली आहे. गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध आम्ही एकूण धावा नजरेसमोर ठेवून मैदानात उतरू, असे मला तरी वाटत नाही. मात्र, आम्ही नेहमीप्रमाणेच खेळ करू जे आमच्या फलंदाजांसाठी अनुकूल आहे.’

संभाव्य संघ : 


भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रोड्रिंग्ज, दीप्‍ती शर्मा, शेफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तान्या भाटिया (यष्टिरक्षक), हरलीन देओल, राजेश्‍वरी गायकवाड, ऋचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर.


न्यूझीलंड : सोफी डिवाईन (कर्णधार), रोजमेरी मेयर, अमेलिया केर, सूजी बेटस्, लॉरेन डाऊन, मॅडी ग्रीन, होली हडलस्टन, हेले जेन्सेन, लीग कास्पेरेक, जेस केर, केटी मार्टिन (यष्टिरक्षक), केटी पर्किन्स, अन्‍ना पीटरसन, रेचेल प्रीस्ट, ली ताहुहु.

स्थळ : मेलबर्न

वेळ : सकाळी 9.30 पासून

प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क


 

Back to top button