दिल्ली हिंसाचारावर युवराज म्हणतो, सरते शेवटी आपण सर्व.. | पुढारी

दिल्ली हिंसाचारावर युवराज म्हणतो, सरते शेवटी आपण सर्व..

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या दोन – तीन दिवस सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने प्रचंड प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारात आतापर्यंत जवळपास 22 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर 190 च्या वर लोक जखमी झाले आहेत. दोन दिवसात उत्तर पूर्व दिल्लीत जाळपोळ आणि दगडफेकीचे बरेच प्रकार घडले होते. त्यानंतर देशभरातील नामवंत व्यक्तींनी दिल्लीच्या लोकांना शांतता आणि सौदार्ह राखण्याचे आवाहन केले. याच क्रीडा जगतही मागे राहिले नाही. भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवाग यांनीही ट्विट करुन शांतता आणि बुंधूभाव कायम राखण्याचे आवाहन केले. 

युवराज सिंगने ‘ दिल्लीत काय चालले आहे ते मनाला वेदना देणारे आहे, सर्वांना विनंती आहे की शांतता आणि सद्भाव कायम राखावा. परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन योग्य ती पावले उचलेल अशी आशा आहे. सरते शेवटी आपण सर्व माणसे आहोत, आपल्याला प्रत्येकावर प्रेम आणि आदर करण्याची गरज आहे. #DelhiBurning’ असे ट्विट करुन शांततेचे आवाहन केले. 

युवराज बरोबर दिल्लीकर असलेल्या विरेंद्र सेहवागनेही ट्विट करुन ‘दिल्लीत जे काही झाले ते दुर्दैवी आहे. माझी सर्वांना विनंती आहे की दिल्ली थंड करा आणि शांतता राखा. कोणालाही दुखापत होणे किंवा नुकसान होणे ही बाब महान देशाच्या राजधानीवर काळा डाग आहे. मी सर्वांसाठी शांतता आणि एकात्मता चिंततो.’ हिंसाचार हे देशाच्या राजधानीवर लागलेला एक कलंक आहे असे मत व्यक्त केले.

 

Back to top button