मुंबई इंडियन्स मारणार का विजेतेपदाचा ‘पंच’ | पुढारी

मुंबई इंडियन्स मारणार का विजेतेपदाचा ‘पंच’

आयपीएल स्पर्धेतील सर्वात महागडा, सर्वात ग्लॅमरस आणि सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स या संघाची ओळख आहे. 2008 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजने 111.9 मिलियन डॉलर्सला मुंबई संघाची मालकी मिळवली. भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा या संघाचा आयकॉन खेळाडू असल्यामुळे मुंबई संघाच्या खरेदीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळाली होती. या संघाने पहिल्या दोन सत्रांत फारशी चांगली कामगिरी केली नाही. परंतु, तिसर्‍या सत्रात म्हणजे 2010 मध्ये मात्र संघाला सूर गवसला आणि त्यांनी उपविजेतेपदापर्यंत धडक मारली. पहिली सहा वर्षे संघ विजेतेपदापासून वंचित होता. 2013 मध्ये संघाने स्पर्धेचे पहिले विजेतेपद मिळवले; पण तेथून पुढील सहा वर्षांत संघाने आणखी तिनदा चॅम्पियनशिप जिंकली. मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकून इतरांना मागे टाकले आहे. मुंबई इंडियन्स हा टी-20 मध्ये शंभर विजय मिळवणारा पहिला संघ आहे.  

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी 2011 मध्ये पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 2013 मध्ये त्यांनी चेन्‍नई सुपर किंग्जला हरवून पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. याचवर्षी त्यांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 2015 मध्ये चेन्‍नई सुपर किंग्जला 41 धावांनी हरवून दुसर्‍यांदा आयपीएलची ट्रॉफी पटकावली. 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंटस् संघाला एका धावेने हरवून आयपीएलचे तिसरे अजिंक्यपद मिळवले. गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये मुंबईने चेन्‍नई सुपर किंग्जला एका धावेने हरवून आयपीएलचे विक्रमी चौथे अजिंक्यपद पटकावले. 2020 च्या 13 व्या सत्रात संघ आता पाचव्या विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. 

मुंबई इंडियन्सने 2020 च्या सत्रासाठी तब्बल दहा खेळाडू रीलिज केले आहेत. यामध्ये एविन लेविस, अ‍ॅडम मिन्ले, जेसन बेहरेनडॉर्फ, ब्युरन हेन्‍रिक्स, बेन कटिंग, युवराज सिंग, बरिंदर सरन, रसिख सलाम, पंकज जैस्वाल, अल्झारी जोसेफ. याशिवाय मयंक मार्कंडेयला दिल्‍लीला देऊन त्याबदल्यात शेरफन रुदरफोर्डला आपल्या संघात घेतले. मुंबईने आपल्या संघातील रोहित शर्मा (15 कोटी रुपये), जसप्रीत बुमराह (7 कोटी रुपये), हार्दिक पंड्या (11 कोटी रुपये), आणि कृणाल पंड्या (8.8 कोटी रुपये) या चौघांना रिटेन केले होते. त्यासाठी त्यांना मोठी रक्‍कम मोजावी लागली होती. मुंबईने यंदा आपल्या संघात ख्रिस लिन, नॅथन कुल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसिन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बळवंतराय सिंग या नव्या खेळाडूंची लिलावातून भर घातली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा सुरुवातीच्या काही सामन्यात खेळू शकणार नसल्याने त्याचा बॅकअप म्हणून मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सनला साईन करून ठेवले आहे. 

मुंबईचा संघ हा नेहमीच तगडा राहिला आहे. कर्णधार रोहित शर्मा हा जगातील कोणत्याही मैदानावर कोणत्याही गोलंदाजीच्या चिंध्या करू शकतो. आता त्याच्या जोडीला वरच्या फळीत ख्रिस लिन, शेरफन रुदरफोर्ड आणि सौरभ तिवारी, इशान किशन, सूर्यकुमार यादव हे खेळाडू आहेत. यष्टिरक्षक क्‍विंटन-डी-कॉकमुळे संघात एक अतिरिक्‍त भरवशाचा फलंदाज मिळाला आहे. अष्टपैलू फलंदाजात केरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या हे आपल्या मनगटातील ताकदीच्या जोरावर विरोधी मारा बोथट करू शकतात. याशिवाय कृणाल पंड्या फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी उपयुक्‍त आहे.

फिरकी गोलंदाजी विभागात संघाकडे राहुल चहर हा युवा दर्जेदार लेगब्रेक गोलंदाज आहे. गेल्या हंगामात त्याने आपली चमक दाखवून दिली आहे. त्याच्या जोडीला जयंत यादव, आणि अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघातील अनुकूल रॉय असतील. या विभागात संघाकडे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले खेळाडू नसल्याने त्यांची भिस्त युवासेनेवरच असणार आहे. 

जलदगती गोलंदाजीत मुंबईकडे आग ओकणारा मारा आहे. मुंबई इंडियन्सचाच फाईंड असलेला जसप्रीत बुमराह प्रतिस्पर्ध्यांसाठी नेहमीच धोकादायक असतो. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये सामन्याचे पारडे बदलण्यात त्याचा हातखंडा आहे. यंदा त्याला मलिंगाची साथ मिळणे मुश्कील आहे; पण मिशेल मॅक्‍लेनघन, ट्रेंट बोल्ट, नॉथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन हे परदेशी वेगवान गोलंदाज आहेत. शिवाय धवल कुलकर्णी हा पुन्हा एकदा होम टीमकडून खेळणार आहे. 

महेला जयवर्धने हा संघाचा मुख्य कोच आहे. रॉबिन सिंग हा संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतरही संघाशी नाते जोडून असून, तो संघाचा फलंदाजांचा मेंटॉर आहे. झहीर खान हा क्रिकेट डायरेक्टर पद सांभाळतो आहे. न्यूझीलंडचा शेन बाँड हा संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

Back to top button