SRHvsRCB : चहलने हैदराबादला पाडले खिंडार, आरसीबीची विजयी सुरुवात | पुढारी

SRHvsRCB : चहलने हैदराबादला पाडले खिंडार, आरसीबीची विजयी सुरुवात

दुबई : पुढारी ऑनलाईन 

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सनराईजर्स हैदराबादचा डाव १५३ धावात संपुष्टात आला. आरसीबीने आयपीएल २०२० चा पहिला सामना १० धावांनी जिंकत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. पाठलाग करणाऱ्या हैदराबादने जॉनी बेअरस्ट्रोच्या ६१ धावांच्या खेळीच्या जोरावर दमदार  सुरुवात केली. पण, आरसीबीचा स्टार लेग स्पिनर यझुवेंद्र चहलने १५ व्या षटकात बेअरस्ट्रो आणि विजय शंकर यांचा पाठोपाठ त्रिफळा उडवत आरसीबीला पुन्हा सामन्यात आणले. या दोन विकेटच्य धक्क्यातून हैदराबाद सावरलाच नाही. चहलने तीन विकेट घेत हैदराबादच्या टॉप ऑर्डरला मोक्याच्या क्षणी खिंडार पाडले. 

रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या १६४ धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादने दमदार सुरुवात केली. कमनशिबी ठरलेला कर्णधार डेव्हिड वॉर्नर ६ धावांवर असताना गोलंदाज उमेश यादवच्या हाताला चेंडू लागून यष्ट्यांवर आदळल्यामुळे धावबाद झाला. पण, याचा फारसा परिणाम हैदराबादच्या धडाकेबाज सुरुवातीवर नाही. दुसरा सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रोने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मनिष पांडेच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी रचली. यामुळे हैदराबादने १२ षटकात ८९ धावांपर्यंत मजल मारली. 

बेअरस्ट्रो आणि पांडेची ही जमलेली आरसीबीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच आरसीबीचा स्टार गोलंदाज यझुवेंद्र चहलने मनिष पांडेला ३४ धावांवर बाद केले. पण, दुसऱ्या बाजूने जॉनी बेअरस्ट्रोने दमदार अर्धशतक पूर्ण करत हैदराबादला शतकाच्या पार पोहचवले. त्याने केलेल्या ४३ चेंडूत ६१ धावांच्या जोरावर हैदराबाद १५ षटकात १२१ धावांपर्यंत पोहचला होता. पण, चहल पुन्हा एकदा आरसीबीच्या मदतीला धावून आला. त्याने जॉन बेअरस्ट्रोचाच त्रिफाळा उडवत आरसीबीला मोठे यश मिळून दिले.

आता हैदराबादला  विजयासाठी २८ चेंडूत  ४३ धावांची गरज होती. क्रिजवर होता विजय शंकर. पण, यझुवेंद्र चहलने त्याचाही त्रिफळा उडवत हैदराबादला चौथा धक्का दिला. या सलग दोन धक्क्यामुळे हैदराबादच्या धावगतीला ब्रेक लागला. ही धावगती वाढवण्याच्या नादात प्रियाम गर्ग ( 12 ) बोल्ड झाला. तर चोरटी धाव घेण्याच्या नादात अभिषेक शर्मा आणि राशीद खान या दोघांची धडक झाली त्यात अभिषेक शर्मा ( ७ ) धावबाद झाला. त्यामुळे हैदराबादची अवस्था १७ षटकात ६ बाद १३५ अशी झाली. हैदराबादला आता १८ चेंडूत २९ धावांची गरज होती. पण, १८ व्या षटकात नवदीप सैनीने राशीद खान ( ६ ) आणि भुवनेश्वर कुमारचा ( ० ) त्रिफळा उडवत हैदराबादपासून सामना दूर नेला. त्यानंतर शिवम दुबेने जायबंदी मिशेल मार्शला बाद करुन हैदराबादच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. हैदराबादला अखेरच्या षटकात विजयासाठी १८ धावांची गरज होती तर आरसीबीला विजयासाठी एका विकेटची गरज होती. ती विकेट डेल स्टेनने घेत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 

आरसीबीकडून चहलने आपल्या फिरकीचा जादू दाखवत ४ षटकात १८ धावा देत ३ विकेट घेतल्या. त्याला नवदीप सैनी आणि शिवम दुबेने प्रत्येकी २ विकेट घेऊन उत्तम साथ दिली. त्यामुळेच १५ षटकात १२१ धावांवर असणाऱ्या हैदराबादला १५३ धावात गुंडाळले.

तपूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा पदार्पण करणारा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याने आपल्या आयपीएलच्या कारकिर्दिची दमदार अर्धशतकाने सुरुवात केली. केरळच्या या डावखुऱ्या सलामीवीरात युवराजच्या फलंदाजीची झलक दिसते. त्याने ४२ चेंडूत ५६ धावांची खेळी करत फिंचच्या साथीने ९० धावांची सलामी दिली. त्याच्या या खेळीमुळेच आरसीबीने ११ षटकात ९० धावांपर्यंत मजल मारली. यात फिंचचे २९ धावांचे योगदान होते.

पण, अर्धशतकानंतर लगेचच विजय शंकरने पडिक्कलचा ( ५६ ) त्रिफळा उडवला. पाठोपाठ अभिषेक शर्माने २९ धावांवर खेळणाऱ्या फिंचलाही बाद करून आरसीबीची  अवस्था बिनबाद ९० धावांवरुन २ बाद ९० धावा अशी झाली. दोन्ही सेट झालेले सलामीवीर पाठोपाठ बाद झाल्यामुळे विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे दोन्ही नवीन फलंदाज मैदानावर आले. 

आरसीबीच्या फलंदाजीची धुरा अनेक वर्षे वाहणाऱ्या या दोन दिग्गजांनी पडिक्कल आणि फिंचने सेट केलेला टेेम्पो कायम राखण्याचा प्रयत्न केला. पण, अखेरच्या ५ षटकात धावांची गती वाढवण्याच्या दबावात १४ धावांवर खेळाणारा विराट नटराजनच्या गोलंदाजीवर राशीद खानकडे झेल देऊन माघारी परतला. विराट बाद झाल्याने मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी डिव्हिलियर्सवर आली. त्यानेही आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत ३० चेंडूत ५१ धावा केल्या. त्यात दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. या खेळीमुळेच आरसीबी १६० च्या पुढे गेला. पण, अखेरच्या षटकातील ३ चेंडू शिल्लक असताना डिव्हिलिर्स बाद झाला. त्यामुळे हैदराबादने आरसीबीला १६३ धावात रोखले.  

हैदराबादकडून भुवनेश्वर कुमराने टिच्चून मारा करत ४ षटकात फक्त २५ धावा दिल्या. तर अभिषेक शर्मा, टी. नटराजन आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी १  विकेट घेत त्याला साथ दिली. 

Back to top button