DC vs RR : मार्शच्या ‘रॉयल’ खेळीमुळे दिल्लीचा विजय | पुढारी

DC vs RR : मार्शच्या ‘रॉयल’ खेळीमुळे दिल्लीचा विजय

मुंबई ; वृत्तसंस्था : मिचेल मार्शच्या तडाखेबंद 89 (62 चेंडू) आणि डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 52 (41 चेंडू) या ऑस्ट्रेलियन जोडीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्स (DC vs RR) संघावर 11 चेंडू आणि 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. या विजयाने 12 गुणांसह दिल्ली संघाने प्ले ऑफमधील आपले आव्हान कायम राखले आहे.

राजस्थान रॉयल्सच्या विजयासाठीच्या 161 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला श्रीकर भारतच्या रूपाने पहिला धक्का बसला, मात्र त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शने आक्रमक फलंदाजी करत 39 चेंडूंत 50 धावा केल्या. मार्शने 38 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 89 धावांवर बाद झाला. वॉर्नर आणि ऋषभ पंत (नाबाद 13) यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी रविचंद्रन अश्विनचे शानदार अर्धशतक आणि देवदत्त पडिक्कलच्या 48 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने विजयासाठी दिल्ली कॅपिटल्स संघासमोर 161 धावांचे आव्हान दिले. राजस्थानचा संघ 20 षटकांत 160 धावांत आटोपला.

दिल्लीच्या चेतन साकरिया, एन्रिच नोर्त्जे आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार्‍या राजस्थान रॉयल्स संघाला जोस बटलरच्या रूपाने पहिला धक्का बसला. बटलर 7 धावा करून चेतन साकरियाच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि यशस्वी जयस्वालने दुसर्‍या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. (DC vs RR)

जयस्वाल 19 चेंडूंत 19 धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला मिचेल मार्शने बाद केले. त्यानंतर अश्विन आणि देवदत्त पडिक्कल यांनी सावध खेळी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. 14 षटकांत राजस्थानने 100 धावांचा आकडा पार केला.अश्विनने 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याने चार चौकार आणि दोन षटकार ठोकले.

अश्विनने दमदार खेळीत करत टी-20 स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. मार्श गोलंदाजीवर अश्विन वॉर्नरकडे झेल देऊन बाद झाला. अश्विन आणि देवदत्त यांच्यामध्ये तिसर्‍या विकेटसाठी 32 चेंडूंत 50 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर देवदत्तच्या साथीला आलेला संजू सॅमसन मात्र आपला प्रभाव पाडू शकला नाही. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो एन्रिच नोर्त्जेच्या गोलंदाजीवर शार्दुल ठाकूरकडे झेल देऊन परतला. त्याला केवळ 6 धावाच करता आल्या.

एका बाजूने खिंड लढवत देवदत्तने संघाचा धावफलक हालता ठेवला. रियान पराग 9 धावा करून साकरियाच्या गोलंदाजीवर झेल देऊन परतला. 17 षटकांत राजस्थानच्या 4 बाद 137 धावा झाल्या. त्यानंतर देवदत्तने शानदार 48 धावांची खेळी करत नोर्त्जेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 30 चेंडूंत 6 चौकार आणि दोन षटकार मारले, मात्र त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. राजस्थानने 113 चेंडूंत 150 धावांपर्यंत मजल मारली.

Back to top button