पर्पल कॅप : चहलला हसरंगाचे कडवे आव्हान | पुढारी

पर्पल कॅप : चहलला हसरंगाचे कडवे आव्हान

मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे आहे, तर पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे आहे. यंदाच्या हंगामात चहलने अफलातून मारा केला आहे. मात्र, रविवारी झालेल्या बेंगलोर आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा चहलच्या खूप जवळ आलाय.

हैदराबादविरोधात पाच विकेटस् घेत हसरंगा पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचलाय. दोघांमध्ये फक्त एका विकेटचा फरक आहे. चहलच्या नावावर 22 विकेटस् आहेत. तर हसरंगा 21 विकेटस्सह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

चहलने यंदाच्या हंगामामध्ये 11 सामन्यांत 44 षटके गोलंदाजी केली करताना 7.25 धावा प्रतिषटक खर्च केल्या आहेत. 14.50 च्या सरासरीने चहलने 22 बळी मिळवले आहेत. म्हणजे प्रत्येक विकेटकरता चहलने 14 धावा खर्च केल्या आहेत.

हसरंगाने 12 सामन्यांत 21 बळी घेऊन चहलला जोरदार आव्हान दिले आहे. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. पंजाबचा कागिसो रबाडा 18, दिल्लीचा कुलदीप यादव 18 आणि हैदराबादचा नटराजन 17, अनुक्रमे तिसर्‍या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

पर्पल कॅप म्हणजे उत्कृष्ठ गोलंदाजसोबतच उत्कृष्ठ फलंदाज महणजेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही लढत पाहायला मिळत आहे. ऑरेंज कॅप शर्यतीत जॉस बटलर 11 सामन्यांत 618 धावांसह आघाडीवर आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल (451) दुसऱ्या क्रमांकावर आहे. फाफ डू प्लेसिस (389) तिसऱ्या स्थानावर आहेत. तर शिखर धवन (381) चौथ्या आणि डेव्हिड वॉर्नर (375) पाचव्या स्थानावर आहे.

Back to top button