ख्रिस गेल : युनिव्हर्स बॉस परत येतोय… | पुढारी

ख्रिस गेल : युनिव्हर्स बॉस परत येतोय...

मुंबई : युनिव्हर्स बॉस म्हणजेच ख्रिस गेल यंदा आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. गेलने मेगा लिलावात आपले नावच दिले नव्हते. पण, आता गेलने स्वत: आयपीएलमधील पुनरागमनाबाबत वक्तव्य केले आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी परत येतोय.. असे वक्तव्य ख्रिस गेलने एका मुलाखतीत केले आहे. आयपीएलमध्ये मी आतापर्यंत कोलकाता, आरसीबी आणि पंजाब संघांचे प्रतिनिधित्व केलेय. मी आयपीएलमध्ये परत येईन.

आरसीबी आणि पंजाब यापैकी एका संघाला आयपीएल स्पर्धा जिंकून द्यायला मला आवडेल. आरसीबीमध्ये माझा चांगला काळ होता. तिथे मी धावांचा पाऊस पाडला होता. आरसीबीमध्ये असताना सर्वात यशस्वी झालो होतो. पंजाबसोबत खेळतानाचाही काळ चांगला होता. मला आव्हानाला सामोरे जायला आवडते. पुढील वर्षी मी परत येतोय, त्यांना माझी गरज आहे, असे ख्रिस गेल म्हणाला.

योग्य वागणूक मिळाली नाही

आयपीएलमध्ये मला जो सन्मान मिळायला हवा तो मिळाला नाही. तसेच मला योग्य वागणूकही मिळाली नाही, असे खळबळजनक वक्तव्य गेल याने केलेय. गेलला मागील काही हंगामात प्लेईंग इलेव्हनमध्ये सतत संधी मिळत नव्हती. तसेच, बायो-बबल आणि थकव्यामुळे आयपीएल 2021 च्या दुसर्‍या टप्प्यादरम्यान माघार घेतली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्याने लिलावातही आपले नाव दिले नव्हते.

टी-20 क्रिकेट गेलशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आयपीएल असो वा आणखी कोणताही स्पर्धा. त्यामध्ये गेलची कामगिरी नेहमीच वादळी राहिली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये गेलच्या नावावर अनेक विक्रम आहेत. गेलने कोलकाता, आरसीबी आणि पंजाब संघाकडून आयपीएलचे सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. तसेच 30 चेंडूंत शतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. आरसीबीकडून खेळताना गेलने अवघ्या 66 चेंडूंत 175 धावांचा पाऊस पाडला होता.

Back to top button