महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा आता पुण्यात | पुढारी

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा आता पुण्यात

मुंबई : महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून ही स्पर्धा येत्या 23 मे ते 28 मे दरम्यान पुण्यात खेळवण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी केली आहे. कोरोना महामारीमुळे महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा 2 वर्षे खेळवण्यात आली नव्हती. यंदा पुण्याला या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने खेळले जाणार आहेत.

पहिला सामना 23 मे, दुसरा सामना 24 मे आणि तिसरा सामना 26 मे ला खेळवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. याआधी महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे आयोजन उत्तर प्रदेशच्या क्रिकेट असोसिएशनला मिळणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र, आता बीसीसीआयने आपल्या निर्णयात बदल केला असून हे सर्व सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत ट्रेलब्लेझर्स, सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी नावाने तीन संघ मैदानात उतरणार आहे. सुपरनोव्हासने 2018 आणि 2019 मध्ये विजेतेपद पटकावले होतं. तसेच 2020 मध्ये ट्रेलब्लेझर्सचा संघ प्रथमच अजिंक्य ठरला. 2021 मध्ये कोरोनामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते.

Back to top button