England vs India : रोहित – राहुलची सावध सुरुवात | पुढारी

England vs India : रोहित - राहुलची सावध सुरुवात

नॉटिंगहॅम; पुढारी ऑनलाईन :

भारत- इंग्लंड (England vs India) यांच्यामधील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर या त्रिकुटाने इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला पहिल्या डावात १८३ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक ६४ धावा केल्या. भारताकडून बुमराहने ४६ धावात ४ विकेट घेतल्या. त्याने आपण पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले.

दरम्यान, भारताने आपल्या पहिल्या डावाची सावध सुरुवात करत दिवसअखेर बिनबाद २१ धावा केल्या. रोहित आणि राहुल दोघेही प्रत्येकी ९ धावा करुन दिवसअखेर नाबाद राहिले. भारत पहिल्या डावात अजून १६२ धावांनी पिछाडीवर आहे.

पहिल्या सत्रात इंग्लंडला दोन धक्के (England vs India)

भारताकडून पहिले षटक टाकणाऱ्या जसप्रीत बुमराहने पाचव्या चेंडूवर रोरी बर्न्सला शुन्यावर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर डॉमिनिक सिब्ले आणि झॅक क्राऊली यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी इंग्लंडचे अर्धशतक धावफलकावर लावण्याच्या इराद्याने फलंदाजी केली.

पण, मोहम्मद सिराजने झॅक क्राऊलीला २७ धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. या विकेटमध्ये विकेटकिपर ऋषभ पंतचा मोठा वाटा होता. त्याने कर्णधार विराट कोहलीला रिव्ह्यू घेण्यासाठी भाग पाडले. क्राऊली बाद झाल्यानंतर कर्णधार जो रुट मैदानावर आला. त्याने सिब्लेबरोबर इंग्लंडचे अर्धशतक धावफलकावर लावले. त्यामुळे इंग्लंडने लंचपर्यंत २ बाद ६१ धावांपर्यंत मजल मारली.

दुसरे सत्र रुट, शमीचे

लंचनंतर भारताने इंग्लंडला अजून एक धक्का दिला. मोहम्मद शमीने डॉमिनिक सिब्लेला १८ धावांवर बाद करत तिसरा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला. इंग्लंडचा तिसरा फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार जो रुटने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली.

त्याने जॉनी बेअरस्टोच्या साथीने इंग्लंडला शंभरी पार करुन दिली. त्यानंतर रुटने आपले अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच शमीने पुन्हा एकदा इंग्लंडला धक्का दिला. त्याने २९ धावांवर खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोला बाद करत चहापानापूर्वीच इंग्लंडला चौथा धक्का दिला.

तिसऱ्या सत्रात त्रिकुटाचा भेदक मारा

चहापानानंतरही शमीने इंग्लंडला धक्के देणे सुरुच ठेवले. त्याने डॅनियल लॉरेन्सला शुन्यावर बाद करत इंग्लंडचा पाचवा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला. शमी पाठोपाठ बुमराहनेही इंग्लंडला धक्का देत जोस बटलरला आफले खातेही उघडू दिले नाही.

दरम्यान, अर्धशतक ठोकणाऱ्या जो रुटने इंग्लंडला दीडशेचा टप्पा पार करुन दिला. मात्र शार्दुल ठाकूरने त्याला ६४ धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. ठाकूरने त्याच षटकात ऑली रॉबिन्सनला बाद करत इंग्लंडची शेपूट लवकर गुंडाळण्यास सुरुवात केली. त्याला बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडला ४ धावांवर बाद केले.

पण, सॅम करनने ( नाबाद २७ ) आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारुन देण्याचा प्रयत्न केला. अखेर बुमराहने अँडरसनचा १ धावेवर त्रिफळा उडवत इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर संपवला.

त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात करत दिवस संपण्यासाठी उरलेली षटके खेळून काढण्याची रणनीती अवलंबली. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी १३ षटकांचा सामना करत बिनबाद २१ धावा केल्या. राहुल आणि रोहित दोघेही प्रत्येकी ९ धावा करुन नाबाद राहिले.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : महाराष्ट्रातील सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

Back to top button