GT vs SRH : हैदराबादचे लखनौसमोर 196 धावांचे आव्हान | पुढारी

GT vs SRH : हैदराबादचे लखनौसमोर 196 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2022 च्या 40 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स (GT)ची सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध लढत होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने गुजरात टायटन्ससमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 195 धावा केल्या.

IPL 2022 मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या शशांक सिंगने 20 व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. याशिवाय मार्को यानसेननेही षटकार ठोकला. फर्ग्युसनने या षटकात एकूण 25 धावा दिल्या. शशांक 6 चेंडूत 25 आणि मार्को यानसेन 5 चेंडूत 8 धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या 5 षटकांत हैदराबादने 4 गडी गमावून 55 धावा केल्या.

हैदराबादला दोन धक्के बसले

हैदराबाद संघाने तीन चेंडूत दोन विकेट गमावल्या. 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यश दयालने एडन मार्करामला डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केले. मार्करामने 40 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदर 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावबाद झाला. त्याला चार चेंडूत तीन धावा करता आल्या.

हैदराबादला तिसरा धक्का

सनरायझर्स हैदराबादला 16व्या षटकात 140 धावांवर तिसरा धक्का बसला. अभिषेक शर्मा 42 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. अल्झारी जोसेफने अभिषेकला बाद केले. त्याने एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी 61 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली.

अभिषेकचे अर्धशतक

12 षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादने 2 गडी गमावून 112 धावा केल्या. डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक 33 चेंडूत पूर्ण केले. रशीद खानच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

अभिषेक-मार्कराम यांच्यात अर्धशतकी भागीदारी

11 षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादने 2 गडी गमावून 96 धावा केल्या. एडन मार्कराम 19 चेंडूत 25 आणि अभिषेक शर्मा 29 चेंडूत 37 धावांवर खेळत होते, त्यावेळी दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली.

शमीने राहुल त्रिपाठीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

सनरायझर्स हैदराबादच्या संघाला पाचव्या षटकात दुसरा धक्का बसला. या षटकात जोरदार नाट्य घडले. शमी हे ओव्हर टाकायला आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने षटकार ठोकला. त्रिपाठीने चौथ्या आणि पाचव्या चेंडूत सलग दोन चौकार मारले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शमीचा चेंडू त्रिपाठीच्या पॅडवर आदळला. पंचांनी शमी आणि गुजरातच्या उर्वरित खेळाडूंचे अपील फेटाळून लावले. यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने रिव्ह्यू घेतला आणि रिप्लेमध्ये चेंडू स्टंपला लागल्याचे दिसून आले. मैदानी पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि त्यामुळे राहुल त्रिपाठी बाद झाला. राहुलला 10 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 16 धावा करता आल्या.

हैदराबादला पहिला धक्का

सनरायझर्स हैदराबादला तिसर्‍याच षटकात पहिला धक्का बसला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीने हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला क्लीन बोल्ड केले. विल्यमसनला आठ चेंडूत पाच धावा करता आल्या. शमीने विल्यमसनला एकूण टी-20 मध्ये सहाव्यांदा पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तीन षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या एक बाद 26 अशी होती.

सनरायझर्स हैदराबाद संघ :

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.

Image

गुजरात टायटन्स संघ :

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, लोकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.

Image

गुजरातचा संघ सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकून 12 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, सनरायझर्स हैदराबाद संघ 10 गुणांसह आणि सातपैकी पाच सामने जिंकत तिसऱ्या स्थानावर आहे. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर जाईल.

Back to top button