PBKS vs CSK : पंजाबचा ‘सुपर’ विजय | पुढारी

PBKS vs CSK : पंजाबचा ‘सुपर’ विजय

मुंबई ; वृत्तसंस्था : सलामीवीर शिखर धवन (नाबाद 88), भानुका राजपक्षे (42) यांच्या शानदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजीच्या बळावर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर (PBKS vs CSK) 11 धावांनी मात केली. या विजयासह पंजाबने गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर झेप घेतली. मात्र चेन्नईच्या अंबाती रायडूची (78) खेळी व्यर्थ ठरली. चेन्नईचा हा सत्रातील सहावा पराभव ठरला.

विजयासाठी 188 धावांचे टार्गेट नजरेसमोर ठेवून मैदानात उतरलेल्या चेन्नईने 20 षटकांत 6 विकेटस् गमावून 176 धावा काढल्या. ऋतुराज गायकवाड व रॉबिन उथाप्पा यांनी चेन्नईच्या डावास सुरुवात केली, पण उथाप्पा (1) लवकर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज व सँटेनर यांनी पाच षटकात संघाच्या 25 धावा फलकावर लावल्या. मात्र, अर्शदीप सिंगने सँटेनरचा (9) त्रिफळा उडविला. त्यानंतर शिवम दुबेला (8) रिषी धवनने त्रिफळाबाद करून चेन्नईची 3 बाद 40 अशी स्थिती केली. आठव्या षटकात चेन्नईचे अर्धशतक फलकावर लागले.

त्यानंतर गायकवाड व रायडू यांनी फटकेबाजी करत संघाला 10 षटकाअखेर 3 बाद 69 अशी स्थिती प्राप्त करून दिली. जम बसलेल्या ही जोडी फोडताना रबाडाने गायकवाडला (30) अग्रवालकरवी झेलबाद केले. गायकवाड व रायडू यांनी चौथ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. एका बाजूने आक्रमक फटकेबाजी करताना रायडूने 28 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले.

शेवटच्या 5 षटकात चेन्नईला 70 धावांची गरज होती. रायडू व जडेजाने 21 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, रबाडाने रायडूचा त्रिफळा उडवत पंजाबसमोरील मोठा अडसर दूर केला. रायडूने 39 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह 78 धावा काढल्या. धोनी मैदानावर आला तेव्हा चेन्नईला 12 चेंडूंत 35 धावांची गरज होती. 19 व्या षटकात 8 धावा निघाल्या. शेवटच्या षटकात धोनी (12) झेलबाद झाला. शेवटी चेन्नईने 6 बाद 176 धावा काढल्या. तर जडेजा 21 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 187 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार मयंकने धवनसोबत पंजाबच्या डावास सुरुवात करताना 37 धावांची सलामी दिली. मयंकने 18 धावांवर तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर दुबेकडे झेल दिला. त्यानंतर शिखरने राजपक्षेसोबत आठव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. (PBKS vs CSK)

धवन व भानुका राजपक्षे या जोडीने चेन्नईच्या गोलंदाजीला धैर्याने सामोरे जात 13 व्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. त्यानंतर धवनने आपले कारकिर्दीतील 46 वे अर्धशतक 37 चेंडूंत 5 चौकार व एक षटकारासह पूर्ण केले. या जोडीने दुसर्‍या विकेटसाठीची शतकी भागीदारी 63 चेंडूंत पूर्ण केली.

ही जोडी फोडण्यासाठी चेन्नईने गोलंदाजीतही बदल करून पाहिले मात्र यश आले नाही. शेवटी ड्वेन ब्राव्होने जम बसलेली ही जोडी फोडताना भानुकाला दुबेकरवी झेलबाद केले. त्याने 32 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 42 धावा काढल्या. भानुकाने धवनसोबत दुसर्‍या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी साकारली. 18 व्या षटकात पंजाबचे दीडशतक पूर्ण झाले. यावेळी धवन 75 धावांवर खेळत होता.

प्रीटोरियसने टाकलेल्या 19 व्या षटकात धवन व लिव्हिंगस्टोन यांनी 22 धावा काढल्या. ब्राव्होने टाकलेल्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर लिव्हिंगस्टोन (7 चेंडूंत 19 धावा) बाद झाला. शेवटच्या चेंडूवर बेअरस्टो (6) धावचित झाला. पंजाबने 20 षटकांत 4 बाद 187 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीवीर धवन 88 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईच्या वतीने ड्वेन ब्राव्होने 2 विकेटस् घेतल्या.

* 9000

पंजाबचा डावखुरा सलामी फलंदाज शिखर धवनने चेन्नईच्या तीक्ष्णाला उत्तुंग षटकार खेचून आपल्या टी-20 कारकिर्दीतील 9 हजार धावा पूर्ण केल्या. त्याने आयपीएलमधील 6 हजार धावांचा टप्पाही पार केला.

Back to top button