PBKS vs GT : तेवतियाने सामना फिरवला, गुजरातचा रोमांचकारी विजय | पुढारी

PBKS vs GT : तेवतियाने सामना फिरवला, गुजरातचा रोमांचकारी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामना रंगात आलेला… विजयाचे पारडे दोन्ही बाजूंना झुकत होते… शेवटच्या दोन चेंडूंवर गुजरातला विजयासाठी बारा धावा हव्या होत्या. त्याच वेळी राहुल तेवतिया मैदानात उतरला… सर्वांचेच श्‍वास रोखले होते. तेवतियाने मैदानावर सभोवार नजर मारली आणि लागोपाठ दोनदा चेंडू प्रेक्षकांत भिरकावला आणि गुजरातला पंजाबविरुद्ध रोमांचकारी विजय मिळवून दिला. सारेच अद्भूत आणि अतर्क्य. हार्दिक पंड्याच्या संघाने ही लढत सहा गडी राखून जिंकून आपली विजयी हॅट्ट्रिक पूर्ण केली. शुभमन गिलची तुफानी खेळी हेही या सामन्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. या विजयाबरोबर गुजरातच्या खात्यात आता सहा गुण जमा झाले आहेत. पंजाबचे चार सामन्यांतून चार गुण झाले आहेत. दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी त्यांनी बजावली आहे. गुजरातने 20 षटकांत विजयासाठी आवश्यक असलेल्या 190 धावा फटकावून पंजाबला आश्‍चर्यचकित केले.

गुजरातने मॅथ्यू वेडला स्वस्तात गमावले खरे. तथापि, त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी तडाखेबंद खेळ्या केल्या. दोघांनीही चौकार व षटकारांचा सपाटा लावला होता. सात षटकांत गुजरातने 1 बाद 66 अशी समाधानकारक स्थिती गाठली होती. गिल याने 59 चेंडूंत 96 धावा कुटल्या. त्यात 11 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. साई सुदर्शनने झटपट 35 धावा केल्या. पंजाबकडून कागिसो रबाडाने 2 तर राहुल चहरने एक गडी बाद केला.

त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 189 धावा चोपल्या. पंजाबची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. फलकावर 11 धावा लागलेल्या असताना कर्णधार मयंक अग्रवाल 5 धावा करून तंबूत परतला. त्याला गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने बाद केले. शिखर धवन याने चमकदार 35 धावा केल्या त्या 30 चेंडूंत. त्याने चार वेळा चेंडू सीमापार पाठवला. त्याला राशिद खानने तंबूचा रस्ता दाखवला. जॉनी बेअरस्टो फार काळ टिकला नाही. लॉकी फर्ग्युसनने त्याला बाद केले. बेअरस्टोने फक्‍त 8 धावा केल्या. त्यानंतर मात्र लियाम लिव्हिंगस्टोन आणि शाहरूख खान यांनी गुजरातच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या.

दरम्यान, जीतेश शर्मा आणि ओडीन स्मिथ यांना दर्शन नालकांडे याने लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. पंजाबने सुरुवातीला नऊ तर त्यानंतर दहा धावा प्रतिषटक अशी धावगती राखली. पंधरा षटकांत पंजाबने दीडशेचा पल्ला पार केला. लिव्हिंगस्टोनने 27 चेंडूंत 64 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने राशिद खानच्या गोलंदाजीवर तंबूत परतण्याआधी 7 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली. शाहरूख खानने 8 चेंडूंत 15 धावा करताना दोन षटकार हाणले. तोही राशिद खानचा बळी ठरला. राहुल चहर याने 22 धावा केल्यामुळे पंजाबला मोठा दिलासा मिळाला. खरेतर पंजाबचा संघ 200 हून अधिक धावा करू शकला असता. पण, मोक्याच्या क्षणी त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी चुकीचे फटके मारले. धावा घेतानाही ताळमेळ दिसून आला नाही. गुजरातकडून राशिद खानने तीन, दर्शन नालकांडेने दोन तर हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक गडी टिपला.

Back to top button