श्रीलंकन संघ भारत दौरा : डे-नाईट टेस्ट बंगळूरमध्ये? | पुढारी

श्रीलंकन संघ भारत दौरा : डे-नाईट टेस्ट बंगळूरमध्ये?

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : श्रीलंकेविरुद्ध आगामी डे-नाईट कसोटी सामना बंगळूरमध्ये आयोजित करण्याचा विचार बीसीसीआयकडून करण्यात येत आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे आणि टी-20 मालिका संपल्यानंतर श्रीलंकन संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात 2 कसोटी सामन्यांबरोबरच तीन टी-20 सामन्यांची मालिकाही खेळविली जाणार आहे. टी-20 मालिकेने दौर्‍याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकन संघ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौर्‍यावर येणार आहे. 25 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत दोन्ही संघांदरम्यान दोन कसोटी व तीन टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेच्या कार्यक्रमात बदलही होऊ शकतो. कारण, कसोटी मालिकेपूर्वी टी-20 मालिका खेळविण्यात यावी, असे श्रीलंकन बोर्डाला वाटते. मात्र, मालिकेतील पहिली कसोटी बंगळूरमध्येच आयोजित होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

श्रीलंकेच्या भारत दौर्‍याची सुरुवात टी-20 मालिकेने होऊ शकते. हे सामने धर्मशाला आणि मोहाली येथे होऊ शकतात, तर लखनौला टी-20 सामना मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, मोहालीत गुलाबी चेंडूने कसोटी सामना आयोजित करण्याची योजना आहे. मात्र, मोहालीत पडणार्‍या धुक्यामुळे याचे आयोजन अवघड आहे.

कोहलीची 100 वी टेस्ट

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट बंगळूरमध्ये आयोजित करण्यात आल्यास ही कोहलीची कारकिर्दीतील 100 वी टेस्ट ठरणार आहे. दिल्लीनंतर बंगळूरला कोहलीचे दुसरे घर मानले जाते. कोहलीने आयपीएल कारकिर्दीस रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून सुरुवात केली असून, अद्यापही याच संघाकडून तो खेळत आहे.

Back to top button