‘पुढारी’चे सामाजिक कार्य कौतुकास्पद : पालकमंत्री (video) | पुढारी

‘पुढारी’चे सामाजिक कार्य कौतुकास्पद : पालकमंत्री (video)

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अत्यंत प्रतिकूल समाज घटकातील लोकांचे लसीकरण हे पुण्याईचेच काम आहे. अशा लोकांसाठी सेवा देण्याचे दै. ‘पुढारी’चे हे सामाजिक कार्य कौतुकास्पदच असल्याचे गौरवोद‍्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी काढले. ‘पुढारी रीलिफ फाऊंडेशन’ आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित दिव्यांग लसीकरण मोहिमेचा त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडस् (नॅब) संस्थेच्या शाहूपुरी येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही उपस्थित राहून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्यापासून सामाजिक कार्याचा असलेला वसा दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, चेअरमन डॉ. योगेश जाधव समर्थपणे पुढे नेत आहेत. दै. ‘पुढारी’ लोकांचा आवाज या भावनेतून काम करीत आहे, असे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, दिव्यांगांच्या लसीकरणाचा हा अनोखा उपक्रम आहे. कोरोनाच्या काळात प्रसारमाध्यम म्हणून दै. ‘पुढारी’ने सकारात्मक भूमिका घेतली. लोकांसमोर नेमकी वस्तुस्थिती मांडली. या काळात पेपर घरात आला पाहिजे, अशी सर्वांचीच भावना होती, खरी बातमी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. या काळात व्हॉटस्अ‍ॅपवर काहीही संदेश फिरत होते. मात्र, या काळात सरकारची वस्तुस्थिती सांगणारे संदेश दै. ‘पुढारी’ने घराघरांत पोहोचवले.

पूर आला, दुष्काळ पडला तर काय उपाययोजना करायच्या आहेत, हे सरकारकडे ठरलेले आहे. त्याचा प्रोटोकॉल आहे. मात्र, कोरोनात काय करायचे हेच माहीत नव्हते. मात्र, सर्व सहकार्‍यांनी, हजारो फ्रंटलाईन वर्कर्सनी प्रामाणिक प्रयत्न केले असे सांगत पाटील म्हणाले, गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेत ज्यावेळी पुणे – मुंबईत रुग्ण वेगाने वाढत होते, त्यावेळी जिल्ह्यात 50-100 रुग्ण आढळत होते. ज्यावेळी पुणे-मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली. त्यावेळी जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढली. हा ट्रेंड दुसर्‍या लाटेतही आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. जिल्ह्यात केवळ 90 व्हेंटिलेटर होते. त्यांची संख्या 450 पर्यंत गेली आहे. सीपीआरमध्ये ऑक्सिजन प्लँट बसवला. राज्यात प्रथमच शासकीय रुग्णालयात असा प्लँट उभारण्यात आला. यामुळे एकावेळी सुमारे 400 रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सुविधा निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

लसीकरणात कोल्हापूर राज्यात अव्वल आहे. सुमारे 24 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. नऊ लाखांवर लोकांनी पहिला डोस घेतला आहे. 325 लसीकरण केंद्रे सुसज्ज आहेत. केंद्र सरकारकडून लस लवकर उपलब्ध झाली तर जिल्ह्यात लसीकरणाला वेग येईल, असेही त्यांनी सांगितलेे.

प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केेले. प्रास्ताविकात त्यांनी दै. ‘पुढारी’ची सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी, त्यातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम याबाबतची माहिती दिली. यावेळी गृह राज्यमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत दिव्यांग, अंध नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरण केंद्रापर्यंत येऊ न शकणार्‍यांना रुग्णवाहिकेत लस देण्यात आली. ज्यांना केंद्रावर जाऊन लस घेता येणे शक्य नाही, त्यांना या उपक्रमांतर्गत पुढील टप्प्यात शासकीय मंजुरी मिळताच घराजवळ जाऊन लस दिली जाणार आहे.

यावेळी ‘नॅब’चे अध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे, उपाध्यक्ष बाळ पाटणकर, हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड संस्थेचे अध्यक्ष पी. डी. देशपांडे, उपाध्यक्ष मनोहर देशभ—तार, महापालिकेचे उपायुक्‍त निखिल मोरे, रविकांत आडसूळ, जयेश ओसवाल, माजी उपमहापौर संजय मोहिते, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रकाश बनसोडे, मनपा वैद्यकीय अधिकारी अमोलकुमार माने, दै. ‘पुढारी’चे सहायक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, कार्यकारी संपादक विजय जाधव, निवासी संपादक देविदास लांजेवार, दै. ‘पुढारी’ संचलित ‘प्रयोग सोशल फाऊंडेशन’चे विक्रम रेपे आदी उपस्थित होते.

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची लसीकरण केंद्राला भेट

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दुपारी लसीकरण केंद्राला भेट दिली. दै. ‘पुढारी’ परिवाराच्या या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. पत्रकारितेबरोबर सामाजिक भान जपण्याचे काम दै. ‘पुढारी’ करत आला आहे. अडचणीत आलेल्या जनतेच्या मदतीला धावून जाण्याची दै. ‘पुढारी’ची परंपरा आहे. दिव्यांगांसाठी लसीकरण ही संकल्पना अनोखी आहे. त्यासाठी दै. ‘पुढारी’ला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत, अशा भावनाही यड्रावकर यांनी व्यक्‍त केल्या. 

Back to top button