छत्रपती शाहू जयंती विशेष : काकांचे परदेशातील शिक्षण अन् आजीची काळजी! | पुढारी

छत्रपती शाहू जयंती विशेष : काकांचे परदेशातील शिक्षण अन् आजीची काळजी!

भारताच्या इतिहासात ‘कोल्हापूर’ हे नाव प्रसिद्ध झाले ते फक्त आणि फक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळेच. महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ राजकीय निर्णयच न घेता अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले. विशेषतः सामान्य व गरीब जनतेला आधार दिला. गरिबी हा कोणाच्या वाटचालीतील अडसर ठरू नये याची काळजी ते घेत.

अशाच एका छोट्याशा निर्णयाचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या कुटुंबाने अनुभवला होता. माझे वडील कै. बाळकृष्ण रामचंद्र पारसनीस हे त्यावेळी शाहू महाराजांच्या वाड्यावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. अत्यंत प्रामाणिक व कामात अचूकता यामुळे ते महाराजांच्या खास मर्जीतले. याचवेळी माझे सख्खे काका कोल्हापूरच्या टेक्निकल शाळेत शिकत होते व शाळेच्या शेवटच्या परीक्षेत अत्यंत चांगले मार्कस् मिळवून गुणवत्ता यादीत आले होते. त्यांना परदेशी जाऊन उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती. काकांनी माझ्या वडिलांना महाराजांकडे विचारणा करण्यास सांगितले. प्रथम माझ्या वडिलांना हा विषय पसंत नव्हता; पण त्यांनी आग्रह केल्याने वडिलांनी एके दिवशी महाराजांना याबाबत विचारले. शाहू महाराज शिक्षणासाठी समाजातील सर्व घटकांना मदत करत. त्यामुळे त्यांनी माझ्या काकांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेऊन बोलावले.

जेव्हा महाराजांनी काकांची कागदपत्रे व मार्कस् पाहिले तेव्हा त्यांना खात्री पटली. कोल्हापूरचा एक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाणार हे समजल्याने त्यांना अभिमानही वाटला असावा. त्यांनी माझ्या काकांना परदेशी जाण्यासाठी तयारी करायला सांगितले. त्याप्रमाणे काकांनी न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश घेण्याची प्राथमिकता पूर्ण केली व महाराजांनी त्यांना आनंदाने अमेरिकेला पाठविण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्याप्रमाणे माझे काका न्यूयॉर्क विद्यापीठात पुढचे शिक्षण घेण्यासाठी गेले. यानंतर तिकडून काका नेहमी पत्रव्यवहार करत. त्यात आवर्जून महाराजांना नमस्कार असे. त्याचप्रमाणे तिथल्या वैद्यकीय अभ्यासाची माहिती घेऊन माझ्या वडिलांनाही अमेरिकेस येण्यासंबंधी त्यांनी सुचविले. प्रथम माझ्या वडिलांना ते मान्य नव्हते, परवडणारे नक्कीच नव्हते; पण माझ्या काकांनी याबद्दलसुद्धा महाराजांनाच विनंती करण्यास सुचवले. त्याप्रमाणे एकदा माझ्या वडिलांनी महाराजांना विचारण्याचे धाडस केले. यावर महाराजांनी इतर माहिती विचारल्यावर विचारले की, ‘सध्या तू (माझे वडील) कोणाबरोबर राहत आहेस व तुझ्या घरी कोणकोण आहेत?’ त्यावर माझ्या वडिलांनी सांगितले की, ‘सध्या मी फक्त माझ्या आईसोबतच राहतो.’

यावर महाराजांनी दोन-चार दिवसांत वडिलांना बोलावले व सांगितले की, तुला परदेशी पाठवणार नाहीच आणि तू जायचेही नाही. माझ्या वडिलांना प्रथम काहीच समजले नाही. यावर महाराज म्हणाले की, ‘तू परदेशी गेल्यावर तुझ्या आईकडे कोण बघणार, तिची काळजी कोण घेणार, हे जास्त महत्त्वाचे आहे.’ प्रथम माझ्या वडिलांना आश्चर्य वाटले; पण नंतर खरेच पटले व त्याप्रमाणे त्यांनी महाराजांना सांगितले की, ‘हो, मी आता माझ्या आईला सोडून बाहेरगावी जाणार नाही.’ त्यावर खुश होऊन महाराजांनी माझ्या वडिलांना सरकारी खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची व्यवस्था केली.

माझ्या वडिलांनी ही सर्व हकीगत घरी जाऊन आजीला सांगितली. तेव्हा तिच्या डोळ्यांत टचकन् पाणी आले. ती म्हणाली, ‘बघ, माझी काळजी माझ्या मुलाला नाही; पण त्या महाराजांना आहे. खरंच ते साधे महाराज नाहीत, तर सर्वांची खरीखरी काळजी घेणारे आहेत. त्यांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.’

आता सदरचा निर्णय हा काहींना साधा वाटेल. कारण, माझ्या वडिलांना परदेशी पाठवणे महाराजांना काहीच अवघड नव्हते; पण त्यांना माझ्या वडिलांच्या शिक्षणापेक्षा माझ्या आजीची काळजी जास्त महत्त्वाची वाटली व ते योग्यच होते हे मात्र नक्की.- रमेश पारसनीस

Back to top button