मुंबई : साहिल खानचा चार राज्यांत राहून चकवा देण्याचा प्रयत्न | पुढारी

मुंबई : साहिल खानचा चार राज्यांत राहून चकवा देण्याचा प्रयत्न

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी सिनेअभिनेता साहिल खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबईतून पळ काढला. तिथून गोवा, कर्नाटक, गडचिरोलीमार्गे तो छत्तीसगडमध्ये गेला आणि तेथेच तो लपून राहिला, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली. त्यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी 40 तासांचे ऑपरेशन राबवले.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गुन्ह्यांच्या तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली होती. या गुन्ह्यात साहिल खानचा सहभाग उघडकीस आला होता. त्याने लायन बुक अ‍ॅपचे प्रमोशन करून त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटला उपस्थिती लावली होती. लायन बुक अ‍ॅपनंतर लोटस बुक 24/7 नावाचे दुसरे अ‍ॅप सुरू करण्यात आले होते.
या अ‍ॅपच्या दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या. या पार्ट्यांना बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याच गुन्ह्यांत नंतर साहिल खानची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीनंतर अटकेच्या भीतीने त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज अलीकडेच न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मुंबईतून पळून गेल्यानंतर तो गोवा येथे गेला. तिथे राहिल्यानंतर तो कर्नाटक, गडचिरोलीमार्गे छत्तीसगडला गेला होता. तिथे तो एका हॉटेलमध्ये राहात होता. गोव्यापासून त्याचा विशेष पथकातील अधिकारी पाठलाग करत होते. याच दरम्यान तो छत्तीसगड येथे गेल्याची माहिती प्राप्त होताच या पथकाने तेथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या साहिल खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर नंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला एक मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. सत्य लवकरच सर्वांसमोर येईल, माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे असे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

साहिल खान याने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. यातील काही चित्रपट चांगले चालले तर काही फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याने स्वत:च्या फिटनेसवर भर देण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान त्याने स्वत:ची न्यूट्रिशियन कंपनी सुरू केली होती. त्यानंतर तो महादेव अ‍ॅपशी जोडला गेला आणि त्यात तो पार्टनर म्हणून काम पाहत होता.

दोन मोबाईल जप्त; फॉरेन्सिक चाचणी

साहिलकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहेत. ते दोन्ही मोबाईल तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. या मोबाईलमधून साहिल हा कोणाच्या संपर्कात होता, त्याला किती पैसे मिळाले होते. या पैशांचे त्याने काय केले याचा तपास सुरू आहे.

Back to top button