अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका | पुढारी

अभिनेता संकेत खेडकर साकारणार शनिदेवांची भूमिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ‘जय जय शनिदेव’ ही नवी मालिका येणार आहे. अभिनेता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारणार आहे. याआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेत. पण प्रमुख भूमिका म्हणून ‘शनिदेव’ ही संकेतची पहिलीच भूमिका आहे.

विशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगरचा असून ‘जय जय शनिदेव’ मालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल. काही दिवस आधी ‘जय जय शनिदेव’ मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती. पण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे.

शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. ८ मेपासून तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांचा जीवनप्रवास या मालिकेतून उलगडणार आहे. संकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतो, ते आपल्याला पाहायला मिळेल. ‘जय जय शनिदेव’, ८ मेपासून रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

Back to top button