Indrayani Marathi Serial : आपलं बालपण आठवायला लावणारी ‘इंद्रायणी’ उद्या भेटीला | पुढारी

Indrayani Marathi Serial : आपलं बालपण आठवायला लावणारी 'इंद्रायणी' उद्या भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सालस तरीही खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली. मूर्ती लहान परंतु, तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत. तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू आख्या गावाची म्हणजेच, विठूच्या वाडीची लाडकी आहे. लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच ‘इंद्रायणी’ आपल्या भेटीला येणार आहे. ( Indrayani Marathi Serial )

संबंधित बातम्या 

कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रायणी’ या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. तत्पूर्वी ‘इंद्रायणी’ मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली. या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही करून देण्यात आली. ‘इंदू’ कोण आहे, तिचे आई वडील कोण आहेत, तिचे जग कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजनही यावेळी करण्यात आले. यावेळी ‘इंदू’ची भूमिका साकारणारी सांची भोईर, अनिता दाते, संदीप पाठक स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे यांच्यासह दिग्दर्शक विनोद लव्हेकर उपस्थित होते. दिग्दर्शक आणि कलावंतांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.

कला, साहित्य आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला संत परंपरेचीही तितकीच मोठी परंपरा आहे. याच संत परंपरेने महाराष्ट्राला विचारांची बैठक घालून दिली आहे. याच संस्कारात वाढलेली ही इंद्रायणी. २५ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ‘इंद्रायणी’ आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेबद्दल दिग्दर्शक विनोद लव्हेकर म्हणतात, ”मला फार आनंद झाला आहे की, पुण्यनगरीत आणि तेही विठ्ठल रखुमाई मंदिरासारख्या पावन ठिकाणी आमच्या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार कमाल आहेत. परंतु, विशेष कौतुक आहे ते बालकलाकारांचे. त्यांच्यातील निरागसता, समजूतदारपणा वाखाणण्याजोगा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे बालकलाकार या मालिकेतून प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकतील.’’

कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले की, ‘इंद्रायणी’ ही खऱ्याखुऱ्या माणसांची आपल्या मातीतली… आपल्या मातीचा खरा सुगंध घेऊन आलेली कथा आहे. जी रसिकांना निश्चितच भिडेल. मालिकाविश्वात आपलं वेगळेपण इंद्रायणी नक्कीच सिद्ध करेल, याची आम्हाला खात्री आहे. ( Indrayani Marathi Serial )

“ इंद्रायणी” मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकाच्या भेटीस येत आहेत. या दोन तगड्या कलाकारांबरोबर “जय जय स्वामी समर्थ “ मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय मांडलेकर लिखित या मालिकेची निर्मिती केली आहे.

Back to top button