मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे-पाटील यांच्या वडिलांची भूमिका | पुढारी

मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे-पाटील यांच्या वडिलांची भूमिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज-जरांगे पाटील यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत. २६ एप्रिलला ‘संघर्षयोद्धा’ राज्यात प्रदर्शित होत आहे.

शिवाजी दोलताडे यांचे दिग्दर्शन आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे-पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.

या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत. अगदी खलनायकी भूमिकांपासून चरित्र भूमिकांपर्यंतचं वैविध्य त्यांच्या अभिनयात आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्या आजवरच्या भूमिकांमध्ये एक लक्षणीय भूमिका ठरणार आहे. स्वतःच्या मुलाचा संघर्ष, त्याची उपोषणं, राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Back to top button