सिनी शेट्टी बनली फेमिना मिस इंडिया | पुढारी

सिनी शेट्टी बनली फेमिना मिस इंडिया

मुंबई ः कर्नाटकची सिनी शेट्टी ही ‘फेमिना मिस इंडिया 2022’ ची मानकरी ठरली आहे. मुंबईतील जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये 21 वर्षीय सिनी शेट्टी अंतिम विजेती ठरली. तर राजस्थानची रूबल शेखावत पहिली रनरअप तर उत्तर प्रदेशची शिनात चौहान दुसरी रनरअप ठरली. मिस इंडिया 2021 च्या विजेत्या मानसा वाराणसीने मिस इंडिया 2022 च्या विजेत्या सिनी शेट्टीला विजेतेपदाचा मुकूट घातला. अंतिम फेरीत टॉप फाईव्हमध्ये सिनी शेट्टीसह रूबल शेखावत, शिनाता चौहान, प्रज्ञा अय्याीगिरी आणि गार्गी नंदी यांनी प्रवेश केला होता. यामध्ये सिनीने बाजी मारत मिस इंडियाचा किताब पटकावला.

नवी मिस इंडिया म्हणून आपल्या नावाची घोषणा होताच सिनी शेट्टीने एकच जल्लोष केला. तर अन्य सौंदर्यवतींनी तिचे अभिनंदन केले.
तसे पाहिल्यास सिनी शेट्टी कर्नाटकची रहिवासी असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. ती सध्या चार्टर्ड फायनान्शियल एनालिस्टचा कोर्स करत आहे. तिला नृत्याची मोठी आवड आहे. तिने वयाच्या चौथ्या वर्षीच नृत्यास सुरुवात केली होती; तर 14 व्या वर्षी अरंगत्रम आणि भरतनाट्यममध्ये पारंगत झाली.

दरम्यान, उपविजेत्या ठरलेल्या रूबल शेखावतला डान्स, अ‍ॅक्टिंग, पेंटिंगची आवड आहे. याशिवाय तिला बॅडमिंटन खेळणेही आवडते. सेकंड रनरअप शिनाता चौहान ही एक स्कॉलर असून तिला नेहमीच लीडरशिप घेऊन काम करणे पसंत असते. रविवारी रात्री पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये नेहा धुपिया, कृती सेनन, मनीष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरियो, मिताली राज, मलाईका अरोरा व अन्य सेलिब्रिटी उपस्थित होते. मिस इंडियाचा पुरस्कार पटकावून 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दलड नेहा धुपियाचा यावेळी खास सत्कार करण्यात आला.

Back to top button