अमिताभ, अभिषेक बच्चन कोरोनाबाधित | पुढारी | पुढारी

अमिताभ, अभिषेक बच्चन कोरोनाबाधित | पुढारी

मुंबई : वृत्तसंस्था

शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, त्यांनी स्वत:च ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

यापूर्वीही लीलावती रुग्णालयात ते वरचेवर तपासणी आणि उपचारासाठी जात होते. मध्यंतरी एकदा रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांना गेल्या काही दिवसांपासून घशाचा आणि मणक्याचा त्रास आहे. वेदना असह्य झाल्याने त्यांना तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 4 तास रुग्णालयात दाखल राहिल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली होती. गतवर्षी ‘कौन बनेगा करोडपती’दरम्यान त्यांना गळ्यात त्रास उद्भवला होता. नंतर ते लगेचच ‘लीलावती’त गेले होते. या दुखण्यामुळे ते ‘लीलावती’त अधूनमधून तपासणीसाठी जात असत.

‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पुनीत इस्सरचा ठोसा वर्मी लागल्याने घडलेल्या मोठ्या अपघातातून एकदा ते बचावले होते. बरेच दिवस तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल राहावे लागले होते. दरम्यान, एकदा त्यांच्या आरोग्याची स्थिती ‘क्रिटिकल’ही बनली होती. अवघ्या देशात ते बरे व्हावेत म्हणून यज्ञ, विशेष प्रार्थना झाल्या होत्या.

अभिषेक बच्चनही बाधित

रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी बच्चन यांनी स्वत: ते बाधित असल्याचे स्पष्ट केले. गेल्या 10 दिवसांत जे जे लोक माझ्या संपर्कात आलेत, त्यांनी स्वत:ची चाचणी कृपया करून घ्यावी, असे कळकळीचे आवाहनही महानायकाने या पोस्टमध्ये केले आहे. बच्चन कुटुंबीयांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत, त्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. दरम्यान, अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे आणि महानायकाने त्वरित बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे. नानावटी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

Back to top button