सुशांतसिंग राजपुत प्रकरणावर मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले… | पुढारी

सुशांतसिंग राजपुत प्रकरणावर मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले...

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याची मागणी भाजप करत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आज (दि. ४) भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. आता यावर मंत्री आदित्य ठाकेर यांनी ट्विट करून प्रतिक्रीया दिली आहे.

वाचा : ‘दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या, सुशांतचाही मर्डर’

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, हे तर गलिच्छ राजकारण आहे. कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुदा महाराष्ट्र सरकारचे यश लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकीत करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. असे ट्विमध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

बॉलीवूड हे मुंबई शहराचे महत्वाचे अंग आहे. या उद्योगांवर हजारो जणांचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दूर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलिस याचा खोलवर तपास करत आहेत. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातु म्हणून सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापी होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहीजे. या प्रकरणाची कोणाकडे काही विषेश माहिती असेल तर त्यांनी पोलिसांकडेच द्यायला हवी. पोलिस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी आजही मी संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेकी करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये, असेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

वाचा :    परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं; चाकरमान्यांची फसवणूक : शेलार 

हे तर गलिच्छ राजकारण pic.twitter.com/SvvBtU6qHC


— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 4, 2020

Back to top button